शिवसेना नगराध्यक्षा, नगरसेवकांचा ‘श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी’ गट स्थापन
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांसह शिवसेना 10 नगरसेवकांचा गट : गटनेते पदी नगरसेविका पूनम चव्हाण
मालवण
शिवसेना मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा भगवा मालवण नगरपरिषदेवर फडकला. शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता मोहन वराडकर यांसह १० नगरसेवकांनी एकत्र येत श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी या गटाची स्थापना गटनेत्या नगरसेविका पुनम नागेश चव्हाण यांच्या नेतृत्वात केली आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र आणि ठरावाची प्रत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.
नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मालवण नगरपरिषदेमध्ये निवडून आलेल्या शिवसेना सदस्यांनी ‘श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी’ गट स्थापन केला आहे. गटाच्या गटनेतेपदी पूनम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
गटात नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेवक दिपक पाटकर, निना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, पूनम चव्हाण, सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, मेघा गावकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, भाग्यश्री मयेकर या आहेत. सर्व ११ सदस्यांनी या प्रक्रियेला आपला पाठिंबा दर्शवत स्वाक्षऱ्या केल्या आहेत. गट स्थापन केल्याचे पत्र नगरविकास विभाग जिल्हा प्रशासन सहायक विनायक औंधकर यांना सादर करण्यात आले.
आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात मालवण शहाराच्या विकासासाठी आम्ही सर्व कटीबद्ध असल्याचे गटनेत्या पुनाम चव्हाण यांनी सांगितले.

