महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी पणतीसारखे काम करणारी व विनामूल्य वैद्यकीय सेवा देणारी अमरावतीची संस्था
निरोग संस्था
राष्ट्राचे आणि राज्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मी ज्या काही संस्थांमध्ये काम करीत आहे त्यामध्ये एक आहे आयएएस व दुसरी संस्था आहे आय ए एस एस. पहिली संस्था मुलांना कलेक्टर होण्याचे प्रशिक्षण दुसऱ्या वर्गापासून विनामूल्य देते तर दुसरी संस्था देशातील आणि महाराष्ट्रातील लोकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी देखील प्रशिक्षण विनामूल्य देते. या संस्थेतील डॉक्टर कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च किंवा मानधन घेत नाहीत. फक्त सेवाभाव आहे. तो सेवाभाव लक्षात घेऊनच सर्वजण काम करीत आहेत. जवळपास 26 लाख अनुयायी या संस्थेचे आहेत.
अमरावतीची निरोग संस्था ज्यामध्ये मी देखील आहे ती संस्था महाराष्ट्रातील लोकांचे आरोग्य चांगले करण्यासाठी गेल्या 32 वर्षापासून कार्यरत आहे. या संस्थेत काम करणारे सर्व आपापल्या क्षेत्रातले दिग्गज लोक आहेत. आर्थिक दृष्ट्या संपन्न आहेत. पण त्यांचे लक्ष मात्र महाराष्ट्रातील लोकांच्या आरोग्याकडे आहे आणि म्हणून गेल्या 32 वर्षापासून आम्ही सर्वजण दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये एक सात दिवसांचे आरोग्य शिबीर आयोजित करतो. या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी व विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी उत्तर प्रदेश मधील मेरठ वरून डॉ. गोपाल शास्त्री व त्यांची सहकारी मंडळी येते. या सात दिवसांमध्ये तुमचे आरोग्य कसे चांगले राहील याचे प्रात्यक्षिक करून विनामूल्य प्रशिक्षण दिल्या जाते. विशेष म्हणजे फक्त सात दिवसात तुमच्या प्रकृतीमुळे आमुलाग्र बदल झालेला तुम्हाला लक्षात येईल .
विशेष म्हणजे या शिबिरातील डॉक्टर तुम्हाला औषध देणार नाहीत .फक्त तुमची जी आहार प्रणाली आहे त्यामध्ये बदल करते करतील आणि निकाल फक्त सात दिवसात मिळेल. प्रकृतीबाबत सात दिवसात सकारात्मक निकाल देणारी ही भारतातील नव्हे कदाचित जगातील एकमेव संस्था आहे .
या संस्थेची निर्मिती अमरावती पासून झाली. अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा मनीबाई गुजराती हायस्कूल मधील अकरावीचे विद्यार्थी असलेले डॉ. हेमंत कुमार सुरेश करवा चिमणभाई पटेल अरुण भाई टाक किशोर अग्रवाल मेघनाथ अरोरा पुरुषोत्तम गुप्ता ह्या सगळ्या 1966 मध्ये शिकणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थ्यांनी मोठे झाल्यानंतर जी 66 या संस्थेची स्थापना केली .या संस्थेमार्फत दर तीन महिन्याला हृदयाची ऑपरेशन्स केली जायची. तीही विनामूल्य. त्यासाठी अमरावतीच्या शासकीय सामान्य रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर वापरले जायचे. 1992 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने 2012 पर्यंत हृदय शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या .या संस्थेचे प्रमुख डॉक्टर सी जे हेमंत कुमार यांनी असा एक प्रस्ताव मांडला की आपण हृदय शस्त्रक्रिया करतो पण ह्या शस्त्रक्रिया करण्याची गरजच पडली नाही पाहिजे यासाठी लोकांचे आरोग्य चांगले कसे राहील यासाठी आपण काहीतरी पाऊल उचलू या आणि त्यातून निर्माण झाले आरोग्य व अध्यात्म विकास शिबिर.
आज अमरावती शहरामध्ये राज्यस्तरीय 32 शिबिर घेऊन या निरोग संस्थेने अमरावतीसमोर नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये एक आदर्श उभा केलेला आहे .
सात दिवसाचे शिबीर आयोजित करणे म्हणजे साधी गोष्ट नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून साधारणपणे 300 ते 350 लोक येणार .त्यांचे राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था अल्पोपहाराची व्यवस्था चहाची व्यवस्था जाण्यायेण्याची व्यवस्था हे सगळे करणे म्हणजे तारेवरची कसरत .पण ती कसरत निरोग संस्थेने पेलली.
अमरावती शहरातील उद्योजक श्री सुरेश करवा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे सर्व मित्र कामाला लागले .त्यामध्ये गोरक्षण संस्थेचे एड. अटल नंदकिशोर राठी अरुणभाई टाक ललित भाई सांगानी सत्यनारायण कासट अशोक मुंदडा राधेश्याम भुतडा नंदकिशोर चांडक प्रा. नारायण लाहोटी प्रा. जगदीश कलंत्री विनोद खेतान प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे प्रा. प्रवीण खांडवे डॉ. मंगेश देशमुख व त्यांचे सहकारी गंगाधर नाखले प्रसिद्धी जनसंपर्क अधिकारी श्री रवींद्र दांडगे सुभाष राठी गजानन ताटे डॉ. वैशाली गुल्हाने नानक पिंजानी प्रकाश तनपुरे दीपक करवा अजय जोशी डॉक्टर अनिल अग्रवाल डॉक्टर चंचल अग्रवाल संतोष चांडक हेमंत चांडक सागर झाडे हेमंत गुल्हाने संदेश भुतडा प्रा. प्रकाश लड्डा डॉ.गोकुळ सारडा यांचे सहकार्य मिळाले. या सर्वांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून सात दिवसाचे हे शिबीर पूर्ण करण्यासाठी पण तन मन धनाने समर्पण भावनेने काम करण्याचे ठरविले.
आता 32 शिबिरांचा कालावधी संपलेला आहे. या कालावधीमध्ये प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे. अमरावतीचे हे शिबीर इतके चांगले होते की यामध्ये संपूर्ण राज्यातूनच नव्हे राज्यां बाहेरूनही लोक येतात आणि आपली प्रकृती ठीक करून जातात .सर्वात महत्त्वाचे या शिबिरामधली निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था ही आदर्श आहे. इतके की शिबिराला उत्तर प्रदेश मधून तज्ञ मार्गदर्शक म्हणून येणारे डॉक्टर देखील संपूर्ण भारतात निवास व भोजन व्यवस्थेच्या बाबतीत अमरावती एक क्रमांकावर आहे याची ग्वाही देतात .तसेच शिबीर असावे तर अमरावतीसारखे असे सातत्याने बोलत असतात.
श्री सुरेश करवा यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा टप्प्याटप्प्याने श्री अरुणकुमार टाक श्री एन टी राठी व आता श्री राधेश्यामजी भुतडा यांच्यावर आलेली आहे. श्री सुरेश करवा हे त्यांना योग्य मार्गदर्शन करतात. लोकांना उत्तम प्रकारच्या सोयी देण्यावर भोजन देण्यावर निवासस्थान देण्यावर त्यांच्या कटाक्ष असतो. त्याचबरोबर त्यांचे आरोग्य सात दिवसात चांगले कसे होईल याची ते काळजी घेतात.
आता संपूर्ण देशात आरोग्याची चळवळ फार वेगाने जोर पकडू लागली आहे. आणि निरोग संस्था तर कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शुल्क न घेता लोकांचे आरोग्य चांगले करून देतात. अशाच प्रकारचे उपक्रम आमच्या परिचयातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे येथील डॉ. जया काळे तसेच अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील डॉ.हेमंत उर्फ बाळू भाऊ देशमुख हे देखील मनापासून करतात. मेरठच्या आयएएसएस या संस्थेतूनच तयार झालेले हे कार्यकर्ते आता स्वतंत्र शिबिरे घ्यायला सक्षम झाली आहेत.
कोणत्याही प्रकारचे औषध न घेता आपली प्रकृती ठीक होऊ शकते यावर आता लोकांचा विश्वास बसायला लागलेला आहे. आणि या शिबिरात तर प्रत्यक्ष त्याचे प्रात्यक्षिकच करून दाखविण्यात येते. तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी येता तेव्हा तुमच्या सर्व प्रकारच्या टेस्ट हे डॉक्टर घेतात. आणि शेवटच्या दिवशी तुम्ही जेव्हा जाता तेव्हा सर्व प्रकारच्या टेस्ट परत घेतल्या जातात. तुमच्या टेस्टमध्ये झालेला सकारात्मक बदल तुमच्याच लक्षात येतो. वजन कमी झालेले असते .रक्तदाब समतोल झालेला असतो. शुगर कमी झालेली असते आणि सर्वात महत्त्वाचे तुमच्या मानसिकतेमध्ये प्रचंड बदल झालेला असतो .कारण तुम्ही समविचारी लोकांबरोबर सात दिवस राहता . मेरठवरून आलेल्या डॉक्टरांचे मार्गदर्शन घेता .अनुभव कथनाद्वारे लोकांचे अनुभव ऐकता. त्यामुळे तुमच्या मानसिकतेमध्ये प्रचंड बदल झालेला असतो आणि म्हणून येणारा प्रत्येक जण जाताना आम्हाला धन्यवाद आभार व्यक्त केल्याशिवाय अमरावती सोडत नाही .ही या शिबिराची फार मोठी उपलब्धता आहे.
एखादा उपक्रम सातत्याने 32 वेळा राबविणे हे सोपे काम निश्चितच नाही. यावर्षीचे शिबीर 2 जानेवारी ते 8 जानेवारी 2026 असे सात दिवसाचे अमरावतीच्या धनराज लेन मधील माहेश्वरी भवनमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांची माफक दरात राहण्याची व्यवस्था पण करण्यात आली आहे. शिबिरामध्ये सर्व उपचार विनामूल्य असून फक्त रस अल्पोपहार भोजन दुपारचा काढा अल्पपहार व भोजन याचे नाममात्र शुल्क संयोजकांनी ठेवलेले आहे. आमच्या निरोग संस्थेने तयार केलेली भोजन व्यवस्थेची टीम ज्यामध्ये अगोदर रामसेवक पांडे आणि आता वर्षाताई व सुलभाताई काम करतात. ते या कामात इतके तरबेज झाले आहे की त्यांना संपूर्ण भारतातून जिथे जिथे शिबीर असते तिथून भोजन तयार करण्यासाठी निमंत्रणे येतात इतके कौशल्य त्यांनी त्यात संपादन केलेले आहे.
हे शिबीर म्हणजे सात दिवसांचा लग्न समारंभ आहे. प्रत्येकाची राहण्याची जेवणाची चहाची नाश्त्याची व्यवस्था करायची आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत.पण आम्ही सर्वजण हे काम निष्ठेने समर्पण भावनेने तन-मन धनाने करीत आहोत आणि त्याचमुळे आज अमरावतीचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण राष्ट्रीय स्तरावर शिबीर असावे तर अमरावती सारखे या पात्रतेला पात्र ठरले आहे. या शिबिरासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आपण देखील अमरावतीच्या आमच्या या निरोग संस्थेमध्ये सहभागी व्हावे व या जगन्नाथाच्या रथाला आपला हातभार लावावा अशी अपेक्षा आम्ही केली तर ती वावगी ठरणार नाही.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे कार्यकारिणी सदस्य
निरोग संस्था
अमरावती कॅम्प
9890967003
