*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निरोप तुजला देता वर्षा…*
निरोप तुजला देता देता भरले रे डोळे
वर्ष कधीही नसते राजा गोरे अथवा काळे
करणी असते प्रत्येकाची भलीबुरीचांगली
ठपका देतो वर्षावरती दाखवतो अंगुली..
कष्ट किती ते केले आपण जीव ओतला किती
हे सारे जर केले आपण सांगा कशाची भीती
झोकून द्यावे कामामध्ये यश सामोरी दिसते
वारे वा पठ्या म्हणतंच दैव ही छानच हसते…
कष्टाला यश येते येते पण हवे सातत्य
पराभवही समोर दिसतो चिंता ना करावी मिथ्य
ऊनसावली नियम सृष्टीचे पाठलाग ते करती
ओहोटी संपून लगेच येते सागरास हो भरती…
ढग काळे ते क्षणभर टिकती निळे निळे आकाश
दुर्गंधी ती क्षणभर असते पाठी येई सुवास
दोष न द्यावा वर्षाला हो हिशोब आपला घ्यावा
खरे वर्तलो की हो खोटे केला का आपण कावा…
जरी अपेक्षा वर्षा कडूनी निष्क्रिय स्वत: का व्हावे
घरबसल्या का वर्षाने हो काही आणून द्यावे?
देण्याचा संकल्प करावा म्हणजे आपणा मिळते
दिल्यावाचूनी कधी न आपुले नशिब पहा फळफळते…
वर्षाला घडवावे आपण यश खेचून आणावे
ह्या वर्षी मी करून दाखविन असे नेहमी म्हणावे
निश्चयाचे बळ फळफळते वर्ष सुखाचे जाते
किती ते होते वर्ष सुखाचे उगाच मन ते म्हणते…
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
