सावंतवाडी खरेदी-विक्री संघातर्फे शासकीय हमीभावाने भात खरेदीचा शुभारंभ….
शेतकर्यांनी आपली नोंदणी पूर्ण करावी;प्रमोद गावडेंचे आवाहन…
सावंतवाडी
सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने शासकीय हमीभावाने भात खरेदीचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांच्या हस्ते माठेवाडा येथील केंद्रावर हा प्रारंभ झाला. यंदा शासनाने भाताला २३६९ रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला असून, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील एकूण ९ केंद्रांवर ही खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे.
९ केंद्रांवर होणार खरेदी:
शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी दोन्ही तालुक्यांतील महत्त्वाच्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यात खालील गावांचा समावेश आहे:
सावंतवाडी (माठेवाडा)
मळगाव, मळेवाड, तळवडे
कोलगांव, मडुरा, डेगवे
इन्सुली आणि भेडशी या केंद्रावर भात शासकीय हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी ‘ऑफलाईन’ पर्यायाचा लाभ घेण्याचे आवाहन:
यावेळी बोलताना अध्यक्ष प्रमोद गावडे म्हणाले की, “आतापर्यंत ९ केंद्रांवर ८०८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ऑनलाईन नोंदणी आणि सातबारा संदर्भातील तांत्रिक अडचणींमुळे यंदा नोंदणीचे प्रमाण काहीसे घटले आहे. मात्र, शासनाने आता ऑफलाईन पद्धतीने सर्वेक्षण करून नोंदणी करण्यास परवानगी दिली आहे. तरी ज्या शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांनी तातडीने संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधून आपली नोंदणी पूर्ण करावी आणि हमीभावाचा लाभ घ्यावा.”
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष रघुनाथ रेडकर, संचालक प्रमोद सावंत, प्रवीण देसाई, आत्माराम गावडे, ज्ञानेश परब, शशिकांत गावडे, विनायक राऊळ, दत्ताराम कोळमेकर, अभिमन्यू लोंढे, गुरूनाथ पेडणेकर, रश्मी निर्गुण, सगुण जाधव आणि व्यवस्थापक महेश परब,सागर गावकर आदी उपस्थित होते.
यावेळी शेतकरी रामा गोसावी, अनिल सावंत, हेमंत राऊळ, हरिश्चंद्र तेली, श्वेता सावंत, सखाराम सावंत, प्रवीण गावडे, अजित रूपजी, लक्ष्मीकांत परब, सखाराम गावडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
