मुक्ताई ॲकेडमीच्या खेळाडूचे सलग चौथ्या वर्षी राज्य पातळीवर यश
सावंतवाडी:
रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीची चौदा वर्षीय साक्षी रामदुरकर हिने उपविजेतेपद पटकावत आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि रत्नागिरी जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रिडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सतरा वर्षांखालील मुलींच्या गटात साक्षीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत मजल मारली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला सन्मानचिन्ह, सिल्व्हर मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक श्री. कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षीने हे यश संपादन केले आहे. मागील चार वर्षांपासून साक्षी कॅरम व बुद्धिबळ या दोन्ही खेळांमध्ये विभागीय व राज्यस्तरावर सातत्याने यश मिळवत आहे.
या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक व नागरिकांकडून साक्षीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
