रेल्वे सेवेनंतर अखंड समाजकारण व कला क्षेत्रातील योगदानाची दखल
मुंबई / डोंबिवली :
डोंबिवली येथील प्रसिद्ध सामाजिक संस्था तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेवक आणि रेल्वेचे निवृत्त अधिकारी जयवंत सगुण पालव यांना काल प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ, निःस्वार्थ आणि उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे.

९४ वर्षीय जयवंत पालव यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. १२ जून १९३२ रोजी जन्मलेल्या पालव यांनी मध्य रेल्वेमध्ये ट्रेन परीक्षक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली. १ जुलै १९९० रोजी सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपला संपूर्ण वेळ समाजसेवेसाठी समर्पित केला.
सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. राष्ट्रसेवा दल व साने गुरुजी मित्र मंडळाचे निष्कलंक कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत राहिले. तसेच लोकसेवा समिती, डोंबिवली (प.) यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला.
समाजकारणासोबतच कला क्षेत्रातही त्यांची वेगळी ओळख आहे. उत्तम नटसम्राट, अभिनेते म्हणून तसेच हार्मोनियम वादक म्हणून त्यांनी नाट्यगीते, भक्तिगीते व देशभक्तीपर गीतांची सेवा केली आहे. वाचन, लेखन आणि नाट्यसंगीत हे त्यांचे आवडीचे विषय आहेत.
डोंबिवलीतील लक्ष्मण स्मृती, श्रीखंडेवाडी येथे १९६४ पासून वास्तव्यास असलेले जयवंत पालव स्थानिक प्रश्नांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे समाजप्रेमी म्हणून ओळखले जातात. पुरस्कार सोहळ्याप्रसंगी तरुण मित्र मंडळाचे पदाधिकारी व डोंबिवलीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाने त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

