मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मुंबईत सुमारे १.५० कोटी ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास असून, त्यांच्यापैकी अनेक जण वेळेचा योग्य उपयोग न होणे, अनुभव सांगण्यासाठी संवादाचा अभाव तसेच निवृत्तीनंतर उद्भवणारी आर्थिक तंगी अशा समस्यांना सामोरे जात आहेत. गावी घर बांधणे, मुलांचे लग्न किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी आयुष्याची जमापुंजी खर्च झाल्याने पुढील आयुष्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत असून, याचा परिणाम त्यांच्या सामाजिक संपर्कांवरही होत आहे.
या पार्श्वभूमीवर सुखवस्तू तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या सर्वच ज्येष्ठ नागरिकांसाठी शिव उद्योग संघटना कमी गुंतवणुकीत आणि कमी अंगमेहनतीत सुरू करता येतील अशा सोप्या व्यवसाय संधी उपलब्ध करून देत आहे. या उपक्रमांतर्गत व्यवसाय सुरू करताना आणि तो चालविताना शिव उद्योग संघटना प्रत्येक टप्प्यावर संबंधित ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत ठामपणे उभी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या योजनेत ज्येष्ठ नागरिक साहाय्य सेवा महत्त्वाची असून, एकटे राहणाऱ्या किंवा ज्यांची मुले बाहेरगावी असतात अशा नागरिकांना बँकिंग व शासकीय कामे, पेन्शनविषयक प्रक्रिया, लाईट बिल भरणे, टॅक्स फाईल करणे, डॉक्टरांकडे जाण्यासाठी सोबत करणे, औषधांचे नियोजन तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू व औषधे घरपोच देण्यासारख्या सेवा देण्यात येणार आहेत. यासोबतच सुखवस्तू ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधणे व गप्पा मारणे हेदेखील या सेवेत समाविष्ट आहे.
नोकरी करणाऱ्या पालकांसाठी बालसंगोपन व डे-केअर सेवा तसेच परदेशात किंवा इतर शहरांत राहणाऱ्या नागरिकांसाठी होम-चेक व मालमत्ता व्यवस्थापन सेवा या उपक्रमाचा भाग आहेत. यामध्ये मुलांची काळजी घेणे, त्यांना गोष्टी सांगणे व अभ्यासात मदत करणे, रिकाम्या घरांची नियमित पाहणी, साफसफाई, पाणी व वीजबिल भरणे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे करून घेणे यांचा समावेश आहे.
याशिवाय आध्यात्मिक व सामाजिक सेवांद्वारे पूजा-पाठ व पुरोहित सेवा, दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना वाचन सेवा, गृहनिर्माण संस्थांमध्ये सचिव किंवा सल्लागार म्हणून कार्य करणे तसेच फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी सहलींचे आयोजन करण्यासारख्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासोबतच आर्थिक स्वावलंबनास हातभार लागणार असून, “तुम्ही ठरवा, बाकी शिव उद्योग संघटना तुमच्यासोबत आहे,” असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष दीपक विठ्ठल काळीद (९८२०३१७१५०) यांनी व्यक्त केला आहे.
