You are currently viewing समाजाचं हित साधणारं ते खरं साहित्य – साहित्यिक प्रवीण देशमुख

समाजाचं हित साधणारं ते खरं साहित्य – साहित्यिक प्रवीण देशमुख

*प्रेरणा साहित्य संमेलन उत्साहात संपन्न*

वेंगुर्ला / शिरोडा:

समाजाचं हित साधणारं ते खरं साहित्य असतं.म्हणून सामाजिक ताणतणाव कमी करणारं, समाजमनाचं प्रतिबिंब ज्या मध्ये उमटेल अशा प्रकारचं साहित्य निर्माण व्हायला हवं,असे प्रतिपादन कल्याण येथील नामवंत साहित्यिक तथा साहित्यिक चळवळीतील कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी शिरोडा येथे प्रेरणा साहित्य संमेलनात बोलताना केले.

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याने शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने थोर साहित्यिक वि.स.तथा भाऊसाहेब खांडेकर सभागृहात आयोजित केलेल्या प्रेरणा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष ग्रंथप्रेमी भालचंद्र जोशी ,साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक सुप्रसिद्ध कवी विनय सौदागर,खटखटे ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रघुवीर उर्फ भाई मंत्री व कार्यवाह तथा आंबा व्यावसायिक सचिन गावडे व्यासपीठावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित केल्यानंतर प्रसिद्ध गायक शेखर पणशीकर यांनी सादर केलेल्या गीताने संमेलनास प्रारंभ झाला. विनय सौदागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सचिन गावडे यांनी मान्यवरांचा परिचय केला व पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले.

स्वागताध्यक्ष भालचंद्र जोशी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात वाचनाचे महत्व विषद करून आपल्याला वाचनाची व ग्रंथसंग्रहाची आवड कशी लागली या विषयी माहिती दिली.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रघुवीर तथा भाई मंत्री यांनी संमेलनास शुभेच्छा देताना साहित्य संमेलनासारख्या सामाजिक हितकारक कार्यास इतर उत्सवी कार्यक्रमाच्या तुलनेत कमी उपस्थिती लाभत असल्याबद्दल खंत व्यक्त केली व अशा समाजपयोगी उपक्रमास आपले सदैव सहकार्य लाभेल,असे सांगितले.

उद्घाटन सत्रानंतर झालेल्या ‘साहित्यिक संस्थांचे सामाजिक स्वास्थ्यात योगदान’ या विषयावरील परिसंवादात प्रीतम ओगले (आनंदयात्री,वेंगुर्ला), मंगेश मसके (कोंकण मराठी साहित्य परिषद,सिंधुदुर्ग) यांनी आपले विचार मांडले. मांद्रे (गोवा) येथील ‘साहित्य संगम’ या संस्थेचे कार्यवाह प्राचार्य गजानन मांद्रेकर हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते.

भोजनपूर्व शेवटच्या सत्रात कै.कुमुद रेगे स्मृती वाचन साधना उपक्रमाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत वैद्य व चोखंदळ वाचक तथा अभिनेते प्रसाद रेगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.अनंत वैद्य व प्रसाद रेगे यांची या वेळी समयोचित भाषणे झाली.

भोजनोत्तर पहिल्या सत्रात देवगड येथील कवयित्री तथा स्तंभ लेखिका अपर्णा प्रभू परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात प्रा.नीलम कांबळे, अंजली मुतालिक, विनय सौदागर, राजेश वैज, शेखर पणशीकर, दीपक पटेकर, स्वप्नील वेंगुर्लेकर, विशाल उगवेकर, प्रा.मानसी शेट मांद्रेकर, उर्जित परब, सोमा गावडे, राजेंद्र गोसावी, रवींद्र पणशीकर, अर्चना लोखंडे व प्रीतम ओगले यांनी कविता सादर केल्या.

कविसंमेलनाचा समारोप करताना अपर्णा प्रभू परांजपे यांनी कविता लेखनाबरोबरच कविता सादरीकरणाचं तंत्रही कवींनी आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.प्रमाण भाषेत लिहीत असताना कवींनी अधिक सजगपणे लिहिण्याचं भान ठेवलं पाहिजे,असंही त्या म्हणाल्या.

सुप्रसिद्ध ललित लेखक कै.रवींद्र पिंगे व नामवंत ग्रामीण कथाकार शंकर बाबाजी पाटील आणि शंकर खंडू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ‘स्मरण रवी-शंकरांचे’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विनय सौदागर यांनी कै.रवींद्र पिंगे यांच्या, तर प्रा.नीलम कांबळे यांनी शंकर बाबाजी पाटील व शंकर खंडू पाटील यांच्या साहित्याचा आढावा घेतला. प्रा.मानसी शेट मांद्रेकर यांनी कै.रवींद्र पिंगे यांच्या एका ललित लेखाचे, तर रवींद्र पणशीकर यांनी शंकर खंडू पाटील यांच्या एका कथेचे वाचन केले.

समारोप सत्रात आजगाव येथील गोगटे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे खटखटे ग्रंथालयात विनय सौदागर चालवत असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशवंत विद्यार्थ्यांत स्थान मिळवलेल्या रोहित आसोलकर याचा संमेलनाध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,भेटवस्तू व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे यांनी संमेलनासंदर्भात आपले विचार व्यक्त केले.प्रवीण देशमुख यांनी संमेलनातील विविध सत्रांचा अभ्यासपूर्ण आढावा घेत संमेलनाचा समारोप केला.

खटखटे ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्या हस्ते स्वागताध्यक्षांचा,तर सहकार्यवाह रत्नदीप मालवणकर यांच्या हस्ते संमेलनाध्यक्षांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.साहित्य प्रेरणा कट्ट्याचे विनय सौदागर,सरोज रेडकर, सोमा रेडकर व खटखटे ग्रंथालयाच्या ग्रंथपाल प्राची पालयेकर यांनी विविध सत्रांत सहभागी मान्यवरांचा ऋणनिर्देश केला.

समारोप सोहळ्यानंतर स्थानिक नाट्यकलाकार काशिनाथ मेस्त्री, हर्षदा बागायतकर व रवींद्र पणशीकर यांनी ‘एकच प्याला’ नाटकातील भावपूर्ण प्रवेश सादर केला.

खटखटे ग्रंथालयाच्या कार्यक्रम समितीचे अध्यक्ष डॉ.श्रीराम दीक्षित यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

संमेलनास प्रसिद्ध कवी डॉ.सुधाकर ठाकूर, साहित्यिक बाळकृष्ण राणे,आरोंदा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरुण धरणे,आंबा व्यावसायिक जनार्दन पडवळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाच्या प्रवेशद्वारास कै.रवींद्र पिंगे यांचे नाव देण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा