You are currently viewing सावंतवाडीत उद्या लोककलेच्या सादरीकरणाने केशवसूत साहित्य नगरी गजबजणार
Oplus_16908288

सावंतवाडीत उद्या लोककलेच्या सादरीकरणाने केशवसूत साहित्य नगरी गजबजणार

सावंतवाडी :

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित व श्रीराम वाचन मंदिर आयोजित पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी लोककलेचा समृद्ध आविष्कार अनुभवायला मिळणार आहे. सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या केशवसूत साहित्य नगरीत शनिवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून विविध लोककलांचे सादरीकरण होणार आहे.

या कार्यक्रमात आरपीडी हायस्कूलचा वारकरी जागर, आडवी गावच्या महिलांच्या पारंपरिक फुगड्या, पिंगुळी येथील एकनाथ गंगावणे यांचा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ तसेच रामायण व सीता स्वयंवराचे सादरीकरण होणार आहे. याशिवाय देवसू गावच्या महिलांची लोककला आणि कारिवडे येथील गणपत परब यांच्या लोकगीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे.

संमेलनात कविवर्य आ. सो. शेवरे ग्रंथ दालनही रसिकांसाठी खुले राहणार आहे. या दालनात महाराष्ट्र शासन ग्रंथ भांडार–साहित्य संस्कृती मंडळ (कोल्हापूर) प्रकाशित ग्रंथ, कणकवली येथील विघ्नेश प्रकाशन, गोवा येथील विचार ग्रंथ दालन तसेच सावंतवाडी येथील क्षितिज वितरणाचे स्टॉल्स असतील. साहित्यप्रेमींनी या ग्रंथ दालनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा