२७-२८ डिसेंबरला राणी पार्वतीदेवी हायस्कूल येथे संमेलन; ग्रंथदिंडी, काव्यसंमेलन व साहित्यिकांचा सन्मान
सावंतवाडी :
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित व श्रीराम वाचन मंदिर यांच्या आयोजनाखाली सावंतवाडीत शनिवार, २७ व रविवार, २८ डिसेंबर रोजी सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल येथे जिल्हा साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे.
जिह्यातून तसेच जिह्याबाहेरून दिग्गज साहित्यिक, कवी उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनाला सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी उपस्थित राहावे, यासाठी श्रीराम वाचन मंदिर व जिल्हा साहित्य संमेलन आयोजकांनी बुधवारी त्यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रित केले.
साहित्य मंडळातर्फे व श्रीराम वाचन मंदिर यांच्यावतीने जिल्हा साहित्य संमेलन होत आहे. सावंतवाडीच्या संस्थानकालीन नगरीत साहित्य चळवळ पुढे नेण्याचे काम यापूर्वीही झाले आहे. साहित्य चळवळ अधिक व्यापकतेने पुढे जाण्यासाठी सावंतवाडी नगरपालिका सहकार्य करेल.
या साहित्य संमेलनाला निश्चितपणे आम्ही उपस्थित राहू, अशी ग्वाही नगराध्यक्ष सावंत यांनी दिली.साहित्य संमेलनाचे संयोजक श्रीराम वाचन मंदिराचे सचिव रमेश बोंद्रे, संचालक राजेश मोंडकर, ग्रंथपाल महेंद्र पटेल यांनी नगराध्यक्षांना निमंत्रण पत्रिका दिली. सावंतवाडीमध्ये साहित्य मंडळाचे हे पहिले जिल्हास्तरीय साहित्य संमेलन होत आहे.
दोन दिवसांपूर्वीच नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी कार्यभार हाती घेतला आहे. त्यानंतर बुधवारी साहित्य संमेलन संयोजन समितीच्यावतीने त्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली. २७ डिसेंबरला सांकाळी ४ वा. ग्रंथदिंडी व सिंधुदुर्गातील लोककलांचे सादरीकरण होईल. साहित्य संमेलनाचा उद्घाटन समारंभ २८ डिसेंबरला सकाळी ९.३० ते ११.३० वाजता सावंतवाडी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात होणार आहे.
२८ डिसेंबरला मुलाखत, परिसंवाद, काव्यसंमेलन व समारोप होणार आहे. जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच सिंधुदुर्ग जिह्यातील साहित्यिक, सामाजिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष साहित्यिक प्रवीण बांदेकर आहेत. या साहित्य संमेलनात जिह्यातील साहित्यिक, त्याचबरोबर अन्य ठिकाणो साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
