मुंबई–गोवा महामार्गावर नांदगाव येथे आयशर टेम्पोचा भीषण अपघात, चालकाचा बालंबाल बचाव
कणकवली
कणकवली तालुक्यातील मुंबई–गोवा महामार्गावर नांदगाव दत्त मंदिरासमोरील हायवेवरील वहाळा जवळ आज दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. आयशर टेम्पो रस्त्यावरील संरक्षण कठड्याला जोरात आदळल्याने वाहनाचा दर्शनी भाग पूर्णतः चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने या अपघातात चालकाचा बालंबाल बचाव झाला.
या अपघातात आयशर टेम्पो चालक महेंद्र राजाराम वारिक (वय ३८, रा. पडेल वारिकवाडी, ता. देवगड) हा वाहनात अडकून पडला होता. अपघाताची तीव्रता पाहता परिस्थिती गंभीर होती. स्थानिक ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये, पांडुरंग मोरये, गुरुनाथ मोरये, संभाजी पाटील, अनिकेत बिडये, गुरु साळुंखे यांच्यासह त्या ठिकाणाहून प्रवास करणारे एस.टी. चालक व वाहक यांनी अथक प्रयत्न करून चालकाला बाहेर काढले.
यानंतर नरेंद्र महाराजांच्या रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक पांडू तेली यांनी जखमी चालकाला प्राथमिक उपचारांसाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सुदैवाने चालकास किरकोळ जखमा झाल्या असून तो धोक्याबाहेर आहे.
अपघातामुळे काही काळ महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती. घटनेची माहिती नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी बिट अंमलदार चंद्रकांत झोरे यांना दिल्यानंतर बिट अंमलदार चंद्रकांत झोरे, ट्रॅफिक पोलीस श्री. जगताब व घाडी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेसिबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त आयशर टेम्पो बाजूला काढून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला.
