सातार्डा पूल व कवठणी संरक्षण भिंतीसाठी सुदन कवठणकर यांचा प्रशासनावर दबाव
दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन; कवठणकर यांचा इशारा
सावंतवाडी
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या सीमेला जोडणाऱ्या सातार्डा येथील पुलाचा काही भाग खचल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा पूल तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुदन कवठणकर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
तसेच कवठणी येथे मंजूर झालेल्या संरक्षण भिंतीसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही अद्याप या भिंतीचे काम सुरू झालेले नाही. संबंधित काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. यासोबतच साईड पट्टीचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात आज श्री. कवठणकर यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या समस्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
