पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा म्हणून ममता वराडकर यांचा जल्लोषात शपथविधी; विकास, पर्यटन आणि लोकाभिमुख प्रशासनाचा निर्धार
मालवण :
प्रतिष्ठेच्या लढतीत मोठ्या बहुमताने निवडून आलेल्या मालवण नगरपरिषदेच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष शिवसेनेच्या सौ. ममता मनमोहन वराडकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह शिवसेना नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासनातील कर्मचारी, नागरिक यांच्या उपस्थितीत गुरुवारी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. नूतन नगराध्यक्षांचा पदभार सोहळा दिमाखात झाला. पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतषबाजीत ममता वराडकर यांचे रेड कार्पेट घालून पालिकेत जल्लोषी स्वागत करण्यात आले. ममता वराडकर यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने नगरपरिषदेत उपस्थित होते.
मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मोठे यश मिळवले. नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी मालवण नगरपरिषदेच्या १६ व्या नगराध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारताना मोठ्या उत्साहात त्यांचे मालवण नगरपरिषदेत स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, मोहन वराडकर यांसह नगरसेवक दिपक पाटकर, नीना मुंबरकर, पुनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव, सहदेव बापटकर, अघ्नी कांदळकर, मेघा गांवकर, शर्वरी पाटकर, महेश कोयेंडे, भाग्यश्री मयेकर यांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाजपचे नगरसेवक मंदार केणी, अन्वेषा आचरकर, ललित चव्हाण, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर तसेच ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक महेंद्र झाडगुत, मंदार ओरसकर, तपसी मयेकर, अनिता गिरकर यांनीही सौ. वराडकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
नूतन नगराध्यक्षा सौ. वराडकर म्हणाल्या, हा विजय माझा एकटीचा नसून, मालवणच्या तमाम जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा आहे. माझी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब, शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद लाभले. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या निवडणुकीत मालवणकरांनी मतदानरूपी आशीर्वादाने शिवसेनेला साथ दिली. मालवणची जनता हे माझे कुटुंब आहे. निवडणूक काळात आमदार साहेबांनी जो विकासाचा अजेंडा मांडला, त्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. मालवणचा सर्वांगीण विकास, पर्यटन वृद्धी आणि स्थानिक समस्या सोडवणे हीच माझी प्राथमिकता असेल. ज्या विश्वासाने जनतेने मला निवडून दिले आहे, त्या विश्वासाला पात्र राहून सर्व नगरसेवकांना सोबत घेत ‘लोकाभिमुख प्रशासन’ देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन असे नगराध्यक्षा ममता वराडकर म्हणाल्या.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत सामंत म्हणाले, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच शिवसेनेला हे यश मिळाले. आमची ताकद शून्य म्हणणाऱ्यांना नगराध्यक्षा तसेच विजयी नगरसेवक ‘१०’ आकडा गाठून शून्याची किंमत काय असते हे जनतेने दाखवून दिले आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षात नसलेल्या जाणाऱ्या नागरिकांनीही या विजयासाठी अहोरात्र कष्ट घेतले. या सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नातूनच मालवण पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. नागरिकास खाते स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामे गतिमान रित्या मार्गी लावली जातील. या विजयाचे श्रेय जनतेचे आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्य महायुती म्हणून सोबत आहे. आगामी पाच वर्षांत सर्व प्रभागांमधील विकासकामांना प्राधान्य दिले जाईल. आमचे आमदार यांनी जनतेचे प्रश्न घेऊन हिवाळी अधिवेशन पण गाजवले. ही निवडणूक हिवाळी अधिवेशनानंतर झाली असती, तर आमचा नगरसेवक आकडा १५ च्या पार गेला असता.” मालवण पालिकेतील या ऐतिहासिक विजयाचे संपूर्ण श्रेय दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांना दिले. गेल्या दहा वर्षांत शहराचा जो विकास रखडला होता, तो आगामी पाच वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच निवडणूक काळात जनतेला दिलेली आश्वासने आणि १० प्रभागांतील प्रलंबित प्रश्न वर्षभरात सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच आमच्या नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक यांनी पारदर्शक कारभाराची शपथ घेतली आहे. जनतेच्या आशीर्वादाने पारदर्शक कारभार नगरपरिषदेत दिसेल, असे दत्ता सामंत म्हणाले.
शिवसेना जिल्हा समन्वयक माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर म्हणाले, मालवण शहराच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांनी एक मोठे व्हिजन ठेवले आहे. निवडणूक काळात त्यांनी सादर केलेली ‘व्हिजन डॉक्युमेंटरी’ पूर्णत्वास होताना पाच वर्षांत मालवणचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या नगराध्यक्ष प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले २५ डिसेंबर २०१६ रोजी मी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडून येत पदभार स्वीकारला होता. आज योगायोगाने हीच निशाणी नूतन नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याकडे असून नगराध्यक्ष म्हणून तो धनुष्यबाण सोपवताना मला आनंद होत आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ आणि त्यानंतरची चार वर्षे प्रशासकीय राजवट असूनही मी सातत्याने जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता ही जबाबदारी वराडकर यांच्यावर असून शहराच्या विकासासाठी त्यांची जबाबदारी वाढली आहे. निवडणुकीतील विजयाचे श्रेय देताना त्यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्याचेही कौतुक केले. ते म्हणाले, दत्ता सामंत यांनी वाड्यावाड्यात जाऊन अत्यंत प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली. त्यांच्या या मेहनतीमुळे आज हे यश मिळाले आहे. ‘दत्ता सामंत कोण?’ अशी विचारणा करणाऱ्या विरोधकांना निवडणूक निकालातून चपराक बसली आहे असेही त्यांनी सांगितले.
