You are currently viewing खऱ्या अर्थाने विजयी झालेला तरुण सीए श्री विजय जाधव 
Oplus_16908288

खऱ्या अर्थाने विजयी झालेला तरुण सीए श्री विजय जाधव 

 

एखाद्या उद्योग समूहाने जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याच्या ठिकाणी नंतर राष्ट्रीय स्तरावर व नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रगती करीत राहावी ही खरोखरच नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. ही किमया साधली आहे अमरावतीच्या जाधव उद्योग समूहाने. या उद्योग समूहातील एक घटक म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट श्री विजय जाधव. त्यांचे मूल्यांकन खऱ्या अर्थाने विजयी झालेला तरुण असेच करावे लागेल. त्यामागचे कारणही तसेच आहे.

सातत्याने धडपडणारा स्वतः गर्भश्रीमंत असूनही इतरांसाठी परोपकार करणारा इतरांना रोजगार देणारा आणि अनेक बँकांना निर्माण करणारा तरुण म्हणजे विजय जाधव.

 

विजय जाधव यांचा माझा परिचय फार जुना आहे. त्यांचे वडील श्री शंकरराव जाधव व त्यांचे आजोबा श्री गुलाबराव जाधव हे माझे मित्र. माझ्या साहित्यिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीमध्ये ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. श्री शंकरराव जाधव यांचे सुपुत्र श्री विजय जाधव .योगायोगाने त्यांनी माझ्या अमरावतीच्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयातच प्रवेश घेतलेला. त्यामुळे ते आमचे विद्यार्थी झाले व त्यामुळे संबंध अजून दृढ झालेत.

 

विजय जाधव यांनी जे काम केलेले आहे ते शब्दातीत आहे. त्यासाठी स्वतंत्र पुस्तक लिहावं लागेल. मराठा समाजातील हा पहिला तरुण आहे की जो चार्टर्ड अकाउंटंट झालेला आहे. आज काल सर्वांचा नोकरी करण्याकडे कल आहे. पण विजयरावांचा कल मात्र नोकरीपेक्षा नोकरी देणारा होण्याकडे जास्त होता आणि म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला आणि त्यात त्यांनी चांगले भरीव यश संपादन केलेले आहे.

 

आज अनेक बँकांची निर्मिती ही विजय जाधव यांच्यामुळे झालेली आहे. या बँकांची संख्या बरीच मोठी आहे. या बँकामार्फत अनेकांना रोजगार मिळाला .कर्ज मिळाली आणि अनेकांना बँकांना लागणारे साहित्य पुरविण्याची संधी मिळाली. आज विदर्भातील नव्हे मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अनेक बँकांना विजयरावांनी स्वतःच्या मार्गदर्शनामुळे स्वतःच्या पायावर उभे केले आहे. तुमचा कोणताही प्रोजेक्ट रिपोर्ट असो बँक रिपोर्ट असो विजयराव त्यामध्ये तज्ञ आहेत. काम तुमचे मार्गदर्शन आमचे हे तत्व त्यांना गवसले आहे. म्हणून आज अमरावती शहरात त्यांच्या नावाचा चांगला बोलबाला आहे. अमरावती येथील जिजाऊ बँक उभारण्यामध्ये तर त्यांनी स्वतः तन-मन धनाने स्वतःला झोकून दिले आहे. मराठा सेवा संघाची स्थापना झाल्यानंतर संस्थापक एडवोकेट श्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलेल्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद देऊन ही बँक समर्थपणे उभी केली आहे आणि आज या बँकेचे विदर्भात सर्वत्र शाखांचे जाळे पसरले आहे.

 

खरं म्हणजे विजयराव व त्यांचा जाधव उद्योग समूह हा एक अमरावती शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अग्रगण्य उद्योग समूहाच्या यादीत समाविष्ट करावा लागेल. आज त्यांच्या उद्योग समूहामध्ये जवळपास सर्व गाड्यांची डीलरशिप आहे. अमरावतीच्या एमआयडीसीमध्ये त्यांनी स्वतःचे कारखाने उभारले आहेत .ऑइल मिल उभारले आहेत. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर आपले सामाजिक बांधिलकीचे तत्व त्यांनी सांभाळले आहे. म्हणून अमरावती शहरातीलच नव्हे इतरत्र असलेल्या सामाजिक चळवळीच्या पाठीशी ते प्रामाणिकपणे उभे राहतात आणि हेच त्यांच्या मोठेपणाचे लक्षण आहे.

 

उद्योग समूह म्हटला म्हणजे केवळ एका व्यक्तीवर अवलंबून नसतो .सर्वप्रथम परिवारातून साथ पाहिजे. नंबर दोन म्हणजे कर्मचारी व सहकारी चांगले भेटणे गरजेचे असते आणि त्यासाठी उद्योग समूहाचा जो प्रमुख असतो त्याचा स्वभाव हा कारणीभूत असतो. ते तंत्र विजयरावांना गवसले आहे. त्यांनी स्वतः इतरांच्या बँका पतसंस्था व इतर व्यवस्थापना सेट करून दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच ते स्वतःचा उद्योग समूह सर्वोत्कृष्ट तयार करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. त्यांचे बंधू सर्वश्री राजेंद्र संजय हेमंत यांचे तर त्यांना सहकार्य आहेच पण सगळ्यात महत्त्वाचे त्यांचे आजोबा श्री गुलाबराव जाधव वडील श्री शंकरराव जाधव काका श्री वामनराव जाधव व श्री मनोहरराव जाधव यांची भरभक्कम पार्श्वभूमी त्यांच्या पाठीशी आहे. म्हणूनच आज जाधव उद्योग समूहाची ओळख ही सामाजिक बांधिलकी जोपासणारा उद्योग समूह म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र आहे.

 

श्री विजय जाधव हे केवळ औद्योगिक क्षेत्रापुरते किंवा सीए क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर त्यांनी महाराष्ट्रातील विविध उपक्रमामध्ये सातत्याने भाग घेऊन आपला सहभाग नोंदविला आहे. त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर राज्यस्तरावर तसेच स्थानिक स्तरावर त्यांचा अनेकदा गौरव झालेला आहे आणि तो यथोचितही आहे.

 

मला आठवते .तीस वर्षांपूर्वी आम्ही प्रा. श्याम मानव यांची सात दिवसांची भव्य दिव्य व्याख्यानमाला अमरावतीच्या अंबापेठेतील मनीबाई गुजराती हायस्कूलच्या पटांगणात घेतली होती. अमरावती शहरात अशी व्याख्यानमाला यापूर्वी झाली नव्हती आणि आता टीव्ही मोबाईलच्या काळात तर होणेही शक्य नाही. 1994 साली पटांगणात झालेल्या या व्याख्यानमालेला दररोज दहा हजार लोकांची प्रचंड गर्दी असायची. या कार्यक्रमाचा प्रचंड खर्च होता. पण या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विजय जाधव व त्यांचा जाधव उद्योग समूह आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.

 

आपण मोठे होऊन आपण श्रीमंत होऊन चालत नाही. तर त्यासाठी आपल्या समाजाला आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला आणि आपला राष्ट्राला सोबत घेऊन जो चालतो त्याची खरी इतिहासात नोंद होते. ही गोष्ट जाधव उद्योग समूहाला तंतोतंत लागू होते. तत्परता तेजस्विता व तपस्विता या गुणांचा संगम झाल्यामुळे विजयराव प्रत्येकच पाऊल पुढे पुढे टाकत गेले आणि यशस्वी होत गेले .पण ही यशस्वीता संपादन करताना त्यांनी आपली विनयशीलता दानशूरता कर्तव्यनिष्ठता याला कधी धक्का लागू दिला नाही आणि म्हणूनच आज सर्व क्षेत्रात त्यांचा चांगला नावलौकीक आहे.

योगायोगाने व परिश्रमाने श्री विजय जाधव यांनी जिथे जिथे जिथे पाऊल टाकले तिथे तिथे त्यांच्या नावाप्रमाणे विजय प्राप्त झाला. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले. त्यांची मित्रमंडळी त्यांच्या सोबतीला आली. मित्रपरिवार नातेवाईक व समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे याचा वेलू गेला गगनावरी असेच म्हणावे लागेल. विजयरावांच्या पिढीतील जे तरुण आहेत त्यामध्ये विजयरावांचे नाव हे पहिल्याच पाचमध्ये आहे. त्यासाठी त्यांचे कर्तुत्व समय सूचकता नियोजन बद्धता व यशस्विता कामी आलेले आहे. अशा या स्वभावी परोपकारी सदाचारी हसतमुख व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस आहे. योगायोगाने शिक्षणाची गंगा विदर्भात आणणाऱ्या शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचा देखील आजच वाढदिवस आहे. विजयरावांचा आणि पंजाबरावांचा जन्मदिवस एकच असावा हा देखील योगायोग आहे. पंजाबरावांनी शैक्षणिक क्रांती आणि कृषी क्रांती केली तर विजयरावांनी औद्योगिक व व्यावसायिक क्रांती केलेली आहे.त्यांच्या परिवारासाठी त्यांच्या आई श्रीमती सुधाताईसाठी पत्नीसाठी त्यांच्या पाल्यांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. पण हा आनंदाचा दिवसही विजयराव आपल्या सर्व मित्रांना सोबत घेऊन संपन्न करणार आहेत हे त्यांच्या मोठेपण आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मिशन आयएएसतर्फे हार्दिक शुभेच्छा.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा