You are currently viewing ॲड. अनिल निरवडेकरांचा दणदणीत विजय

ॲड. अनिल निरवडेकरांचा दणदणीत विजय

चर्मकार समाज उन्नती मंडळाकडून गौरव; “हा विजय विश्वासाचा आहे”; निरवडेकरांची भावूक प्रतिक्रिया

 

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲड. अनिल निरवडेकर यांनी ९५९ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवत जिल्ह्यातील सर्वाधिक आघाडीचा मान पटकावला. या दणदणीत विजयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ (शाखा सावंतवाडी) यांच्या वतीने त्यांचा व त्यांच्या पत्नी सौ. अनघा निरवडेकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना ॲड. निरवडेकर भावूक झाले. “प्रभाग १० मधील मतदारांनी आणि विशेषतः चर्मकार समाज बांधवांनी दाखवलेला विश्वासच या विजयाचा पाया आहे. प्रतिस्पर्ध्यांवर ६२९ मतांची आघाडी म्हणजे समाजाच्या निरपेक्ष प्रेमाचा सन्मान आहे,” असे त्यांनी नमूद केले.

गेल्या २८ वर्षांच्या संघर्षाचा उल्लेख करताना त्यांनी सूचक शब्दांत विरोधकांवरही निशाणा साधला—“कधी थांबावे हे समजणे महत्त्वाचे असते.”

पुढील कार्यकाळासाठी स्पष्ट ग्वाही देताना ते म्हणाले की, नगरपरिषदेत समाज बांधवांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली जाईल आणि प्रभागासह संपूर्ण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहू. चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या पाठबळाबद्दल त्यांनी विशेष आभार मानले.

या कार्यक्रमात जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, तालुका अध्यक्ष विनायक चव्हाण, निवृत्त उपशिक्षणाधिकारी परशुराम चव्हाण, संदीप बिबवणेकर यांसह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. प्रास्ताविक सावंतवाडी शाखा सचिव जगदीश चव्हाण यांनी केले.

मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा