You are currently viewing १७ वर्षांनंतर कणकवलीत पुन्हा ‘पारकर पर्व’; जल्लोषात संदेश पारकरांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार
Oplus_16908288

१७ वर्षांनंतर कणकवलीत पुन्हा ‘पारकर पर्व’; जल्लोषात संदेश पारकरांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार

फुलांच्या सड्यावरून प्रवेश, घोषणाबाजी–आतषबाजीने दुमदुमला नगरपंचायत परिसर

कणकवली :

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून संदेश पारकर यांनी सोमवारी सकाळी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी कणकवली नगरपंचायत कार्यालयासमोर गर्दी केली होती. तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा पारकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याने शहरात उत्साहाचे वातावरण होते.

पदभार स्वीकारण्यापूर्वी संदेश पारकर यांनी नगरपंचायतच्या पायरीवर नतमस्तक होत कणकवलीकरांचे आभार मानले. मुख्यद्वारापासून नगराध्यक्ष दालनापर्यंत पायऱ्यांवर झेंडूच्या फुलांचा सडा टाकण्यात आला होता. महिला कार्यकर्त्यांनी केलेली पुष्पवृष्टी, कार्यकर्त्यांचा गराडा, घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी या सर्वांमुळे संपूर्ण परिसर जल्लोषात न्हाऊन निघाला.

नगरपंचायत मुख्यद्वारावर पारकर यांचे आगमन होताच जोरदार आतषबाजी करण्यात आली. “प. पू. भालचंद्र महाराज की जय”, “संदेश पारकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मुख्यद्वारावर महिला कार्यकर्त्यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले आणि फुलांच्या सड्यावरून पारकर नगराध्यक्ष दालनात दाखल झाले.

या प्रसंगी माजी आमदार राजन तेली, ठाकरे शिवसेनेचे युवासेनाप्रमुख तथा नवनिर्वाचित नगरसेवक सुशांत नाईक, संकेत नाईक, जाई मुरकर, दीपिका जाधव, रुपेश नार्वेकर, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे, शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख दामू सावंत, प्रथमेश तेली, अ‍ॅड. सुदीप कांबळे, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, माजी नगरसेवक उमेश वाळके, भूषण परुळेकर, राष्ट्रवादी (श.पा.) तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, सुनील पारकर, बाळू पारकर, उत्तम वाळके, सोहम वाळके, प्रदीप आरोलकर, नीलम सावंत-पालव, साक्षी आमडोसकर, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, रिना जोगळे, स्नेहा वाळके, आदित्य सापळे, वैभव मालंडकर, अमित मांडवकर, सौरभ पारकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

नगराध्यक्ष दालनात आगमनानंतर पारकर यांनी अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. यावेळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी प. पू. भालचंद्र महाराज यांची प्रतिमा भेट स्वरूपात देत जयघोष केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

पदभार स्वीकारण्यापूर्वी दालनातील जुनी खुर्ची बाजूला करून नव्या नगराध्यक्षांसाठी नवी खुर्ची ठेवण्यात आली. त्यानंतर संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. कणकवलीच्या राजकीय इतिहासात हा क्षण लक्षवेधी ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा