*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गारठलेला निसर्ग*
( हे वर्णन मिशिगन मधील थंडीचे आहे )
रविकिरणांची तिरीप कोवळी
हिमराशींवर पहा चमकली
रत्नजडित जणु दुलई पांघरून
वसुंधरा ही निवांत निजली
अरुणोदय जरी प्राचीवरती
रंग उषेचे धुक्यात विरती
पर्णविरहित स्तब्ध तरू हे
स्थितप्रज्ञसे संत भासती
असह्य वाटे ही नीरवता
जळात नुरली मुळी खळखळता
शिळा होउनी जशी अहिल्या
भासतात मज तशाच सरिता
अदृष्य जाहले थवे खगांचे
कुठे हरवले कळप मृगांचे
निराधार हे जीव बिचारे
तडफडती का श्वास तयांचे
गारठलेल्या निसर्गातुनी
शिकवितोस का आम्हा जगणे
उतार चढ हे असेच जीवनी
त्यातच राहुनी तुम्हास तरणे?
अरुणा मुल्हेरकर
मिशिगन
