You are currently viewing कणकवलीत तरुणीचा मृत्यू आणि रुग्णालयाची तोडफोड दोन्ही दुर्दैवी…!

कणकवलीत तरुणीचा मृत्यू आणि रुग्णालयाची तोडफोड दोन्ही दुर्दैवी…!

 

कणकवली येथील डॉ.नागवेकर यांच्या खाजगी रुग्णालयात मानेवरील गाठ काढण्यासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीचा झालेला दुर्दैवी मृत्यू पुन्हा एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा पोस्टमोर्टम करणारा ठरला. जिल्ह्यातील बहुतांश शहरात मिळणाऱ्या आरोग्य सेवा आजही गंभीरपणे विचार करण्याइतपत आजारी आहेत आणि जिल्ह्यातील राजकीय अनास्थेपोटी म्हणा किंवा भक्कम असलेल्या डॉक्टर लॉबीमुळे जिल्ह्यात चांगले डॉक्टर येत नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे डळमळीत झाल्यासारखीच अवस्था जिल्ह्यात आहे.

मानेवरील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया तिच्या कारणानुसार (उदा. थायरॉईड गाठ, सिस्ट, लिम्फ नोड, कर्करोग) बदलते. शस्त्रक्रिया पद्धतीमध्ये पारंपरिक चीरा किंवा लेसर/रोबोटिक शस्त्रक्रिया असू शकते, पण अंतिम निर्णय डॉक्टरांच्या निदानावर अवलंबून असतो. डॉक्टर मानेची गाठ स्पर्श करून, तिचा आकार, कठीणपणा, हालचाल आणि आसपासच्या अवयवांवरचा दाब तपासतात. गरजेनुसार संसर्ग किंवा इतर सिस्टिमिक आजार (उदा. थायरॉईड समस्या) तपासण्यासाठी रक्त तपासणी होऊ शकते. गाठीचा आकार, रचना आणि त्यात द्रव आहे की नाही हे पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड देखील करतात. गाठीचा काही भाग किंवा संपूर्ण गाठ काढून पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवली जाते. यातून गाठ सौम्य (Benign) आहे की कर्करोगाची (Malignant) आहे हे निश्चित होते, ज्याला बायोप्सी म्हणतात. थायरॉईडची गाठ असल्यास थायरॉईड फंक्शन टेस्ट (TFT) आणि कर्करोगाच्या इतर प्रकारांसाठी आवश्यक चाचण्या केल्या जाऊ शकतात. परंतु हे सर्व तज्ञ डॉक्टर्सच्या अनुभवांवर आणि काम करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.

कणकवली येथील घटनेमध्ये तरुणीला उपचारासाठी दाखल केल्यावर डॉक्टरनी कोणत्या तपासण्या केल्या होत्या..? त्यात तिला गंभीर काही आजार निष्पन्न झालेला का..? हे पाहणे आवश्यक आहे. त्यांनी ऑपरेशन पूर्व तपासणीत तरुणीला कोणता आजार होता तर तिच्यावर उपचार करण्यापूर्वी तशी कल्पना तिच्या घरच्यांना दिलेली का..? जर तिला कोणताही गंभीर आजार नव्हता तर केवळ मानेवरील गाठीची शस्त्रक्रिया २४ तासात मृत्यू होण्या एवढी जीवघेणी ठरू शकते का..? काहीजणांच्या लिखाणात तरुणीला अस्थमा असल्याचे वाचनात आले परंतु अस्थमा असला तर अस्थमा तारुण्यात एवढा जीवघेणा असेल का..? जर यातील कोणत्याही प्रश्नाला उत्तर नसेल तर १९ वर्षीय तरुणीचा शस्त्रक्रियेनंतर काही तासात मृत्यू का झाला..? हा प्रमुख प्रश्न उरतो. ज्याचं उत्तर पोष्टमोर्टेम रिपोर्ट मध्ये मिळेलच पण.., त्यात डॉक्टर दोषी ठरतील का..? ठरेलच तर केवळ पैशांच्या स्वरूपात आर्थिक नुकसानभरपाई देऊन झालेले नुकसान भरून निघेल का..? गेलेली व्यक्ती परत येईल का..? हे प्रश्न मात्र उत्तरांविना तिच्या सोबतच चितेवर चढतात, भस्मसात होतात.

धडधाकट तरुणी शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने पुढील उपचारार्थ कोल्हापूर इथे पाठवली तरी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरची जबाबदारी संपत नाही किंवा ते हात झटकवायला देखील मोकळे होत नाहीत. त्यामुळे कोल्हापूर येथे नेल्यानंतर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावातील, दशक्रोशीतील लोक संतापले आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर देत नसल्याने रुग्णालयाची अतोनात तोडफोड करण्यात आली. त्यावेळी रुग्णालयात ॲडमिट असलेले रुग्ण, कर्मचारी यांचा देखील जनसमुदायाने विचार केला नाही. “रागाला डोळे नसतात की नसतो मेंदू…” त्याच रागाच्या भरात शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लोकांनी मागेपुढे न पाहता, कसलाही विचार न करता रुग्णालयाची तोडफोड केली. तोडफोड करून काही निष्पन्न होणार नाही हे त्यांना ज्ञात नसेल असे नव्हे तर त्यामुळे केवळ आलेला संताप, भडकलेला राग शांत झाला. ही तोडफोड करण्यास कारण एकमेव कासार्डेवासियांसोबत घडलेलीच घटना असेल असे नव्हे तर सदर रुग्णालयाकडून त्यापूर्वी इतर गावांतील कोणावर अन्याय झाला असेल तर त्या लोकांनी देखील संधीचा फायदा करून घेत आपला पूर्वीचा राग काढलेला असू शकतो. त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने जमाव जमलेला होता. तोडफोड समर्थनीय नक्कीच नाही आणि पोलिस देखील त्याला आवर घालू शकले नाहीत कारण, तो भावनेचा प्रश्न होता. एक निरपराध जीव नाहक प्राणास मुकला होता.

चूक कोणाची..? हे कालांतराने समजणार पण, म्हणून गेलेला जीव परत येणार नाही की चूक असली तरी चूक असणाऱ्या डॉक्टर ना शिक्षा होणार नाही. पण तरीही तोडफोड करणाऱ्यांची चूक झाली म्हणून डॉक्टर युनियनने जिल्ह्यातील दवाखाने एक दिवस बंद ठेवणे, तोडफोड प्रकरणात सामील असलेल्या दोषींवर कारवाई व्हावी यासाठी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देणे, दबावगट निर्माण करणे “अन्यथा दवाखाने बेमुदत बंद ठेऊ”, अशी धमकी वजा इशारा देणे हे देखील योग्य नव्हे. कारण डॉक्टरी हा पेशा असला तरी ती सेवा आहे. त्याकरिताच डॉक्टरेट मिळविल्यानंतर ते देवाची शपथ घेतात की, ते रुग्णांना त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम उपचार देतील, गुप्तता पाळतील, आणि वैद्यकीय ज्ञान इतरांना देतील. यानुसार रुग्णांची सेवा, पद आणि ज्ञानाचा वापर लोककल्याणासाठी करणे यावर भर असतो. परंतु आजकाल ही शपथ बहुतांश डॉक्टर विसरले असून सेवा कमीच मेवा खाण्यावर अनेकांचा भर असतो. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच डॉक्टर आज जिल्ह्यात सेवाभावीवृत्तीने काम करताना दिसतात. परिणामी कणकवलीत जशी घटना घडली तशी दुर्दैवी घटना घडते आहे…आणि दोषी मात्र आंदोलनात्मक पावित्रा घेणारी जनता ठरते आहे.

डॉक्टर म्हणजे देव नव्हे, देवमाणूस म्हणा हवंतर; किंबहुना देव सुद्धा देव्हाऱ्यात पुजला किंवा देवाची उपासतापास करून भक्ती केली तरी प्रत्येकवेळी पावतोच असे नाही. डॉक्टर बाबतही तसेच आहे. कधीतरी ते सुद्धा चुकतात. परंतु ती चूक जीवघेणी ठरते किंवा अधून मधून अशा चुका होत राहतात तेव्हा कधीतरी त्याचा उद्रेक होतो. जिल्ह्याच्या मध्यवर्ती दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रख्यात डॉक्टरच्या रुग्णालयात सावंतवाडीतील एका रुग्णाची एक ब्लॉकेज असताना अँजिओप्लास्टी झाली. परंतु त्यानंतर तो रुग्ण अत्यवस्थ झाला, अतिदक्षता विभागात त्याचे हात पाय बांधून ठेवण्यात आले…आणि अँजिओप्लास्टी झालेल्या त्या रुग्णाचे शेवटी त्याच हॉस्पिटलमध्ये निधन झाले. शुद्धीत असताना त्या रुग्णाने “डॉक्टर तुम्ही मला मारून टाकणार” असे डॉक्टरांना सांगितल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी ऐकले होते. डॉक्टर कोणीही असोत ते रुग्ण वाचावा यासाठीच प्रयत्न करतात. पण.., उपचार करण्याची पद्धत, स्किल, अनुभव कमी पडला की, दुर्दैवाचे फेरे सुरू होतात. अशावेळी त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी झालेली घटना दुर्दैवी म्हणून आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन मान्य केले अन्यथा अशाप्रकारे झालेला मृत्यू म्हणजे ते त्या डॉक्टरचे अपयश असते. डॉक्टर कडून रुग्णाच्या आजाराचे निदान करताना आजाराचे स्वरूप, गांभीर्य न समजल्याने चूक झाली किंवा उपचार करताना कौशल्य कमी पडलेले असते. तरीही डॉक्टरने केलेल्या उपचाराचे पैसे घेतलेले असतात. अशावेळी रुग्ण कल्याणासाठी एखादी संघटना कार्यरत झाली तर अव्वाच्यासव्वा पैसे उकळून देखील खात्रीशीर चांगले उपचार न देता बेभरवशी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर्सना ते परवडणार आहे का..?

नाही ना…!

यासाठीच कणकवली येथे दुर्दैवाने घडलेल्या घटनेत आक्रमक झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांवर, ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यासाठी एकत्र येणाऱ्या डॉक्टर्स संघटनेने घटनेचे गांभीर्य ओळखून पाऊल उचलणे आवश्यक आहे, होते….असेच मत जनसामान्यांचे आहे कारण दाल मे कुछ तो काला हैं!

प्रतिक्रिया व्यक्त करा