*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शांत रात्रीच्या कुशीत*
शांत रात्रीच्या कुशीत
द्यावे स्वत:स झोकून
तन मन थकलेले
निद्रा देवीच्या स्वाधीन….
गात्र गात्र विसावते
तिच्या कुशीमधे शांत
कोलाहल विचारांचा
थांबवते ती आकांत….
जडावती पापण्या त्या
नीज येते डोळ्यावर
उबदार कुशीमधे
तगमग होई दूर….
मंद दिवा तेवणारा
झोप हलकेच येते
स्वप्न येतात सुंदर
जग आभासी दिसते…
इथे सारे मनाजोगे
रम्य मायेची नगरी
पडे विसर जगाचा
जादू अशी घडे न्यारी…
निळ्या आभाळी सजते
चंद्रकोर छान किती
नभी नक्षत्रांच्या राशी
पसरते शुभ्र दिप्ती…..
विसरती कष्ट सारे
चिंता काळज्या काहूर
पांघरते चांदण्यांचा
जेव्हा तलम पदर….
निद्रादेवी तुझी सदा
करताच आराधना
सौख्य निद्रेचे लाभते
हलविता तू पाळणा…..!!
०००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार@✍️
