You are currently viewing सिंधुदुर्गात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढविणार

सिंधुदुर्गात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढविणार

*सिंधुदुर्गात जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढविणार*

*मागील साडेतीन वर्षातील सत्ताधाऱ्यांचे अपयश जनतेसमोर मांडणार*

*कणकवली विजय भवन येथे जिल्हाकार्यकारिणीची बैठक संपन्न*

कणकवली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाकार्यकारिणीची बैठक आज कणकवली विजय भवन येथे माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. होऊ घातलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढविण्यात येणार असून तालुकाप्रमुख यांनी बैठका घेऊन आपआपल्या तालुक्यातील इच्छुक उमेदवारांची मतदारसंघ निहाय नावे देण्यास सांगण्यात आले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर तात्काळ अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून समाजसेवेत अग्रेसर असणारे होतकरू,सुशिक्षित,उच्चशिक्षित आणि उच्च विचारसरणीचे उमेदवार निवडणुकीत उतरविले जाणार आहेत अशी माहिती परशुराम उपरकर,वैभव नाईक,सतीश सावंत,बाबुराव धुरी यांनी दिली आहे.
मागील साडेतीन वर्षे राज्यात भाजप- शिंदे गट महायुतीची सत्ता आहे. हे सत्ताधारी मतांसाठी पैसे देत असल्याने जनतेच्या प्रश्नांचे त्यांना काहीही पडलेले नाही. त्यामुळे आज जिल्ह्यात अनेक ज्वलंत प्रश्न निर्माण झाले आहेत. पैसे देऊन कोणतीही निवडणूक जिंकू शकतो अशी सत्ताधाऱ्यांची भावना झाली असून जनतेच्या सहकार्याने सत्ताधाऱ्यांचा हा डाव जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना मोडून काढणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.सरकारी रुग्णालयात डॉकटर उपलब्ध नाहीत.मशीनरी बंद पडल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वाढीव वीज बिल आकारून भाजपकडून नागरिकांची लूटमार केली जात आहे. जिल्हावासीयांना बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांना भात शेतीची योग्य नुकसान भरपाई मिळाली नाही. कृषिपंप मिळत नाहीत.सिंचन विहिरींचा निधी मिळत नाही. वनसंज्ञा असलेल्या जमिनींचा प्रश्न निकाली लागलेला नाही.शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा सरकारचा डाव आहे.हत्ती, माकड, रानगवे शेतीचे नुकसान करीत आहेत. जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत.रस्ते बांधकामासाठी सत्ताधारी निधी मंजूर करून आणू शकले नाहीत. जिल्हा नियोजनचा देखील निधी प्राप्त झालेला नाही. ठेकेदारांची देयके प्रलंबित आहेत. डीएड बेरोजगारांची भरती केलेली नाही. लाडकी बहीण योजनेतुन अनेक लाभार्थ्यांना कमी करण्यात आले आहे. जिल्ह्यात असे अनेक प्रश्न असून हे प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत.जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविणार आहोत. तसेच मतदार यादीत दुबार नावे व मतदार यादीतील घोळ याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहोत असे यावेळी परशुराम उपरकर,वैभव नाईक,सतीश सावंत,बाबुराव धुरी यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,तालुकाप्रमुख राजन नाईक,कृष्णा धुरी, हरी खोबरेकर, नंदू शिंदे, रमेश सावंत, बबन बोभाटे,सचिन कदम, सुशांत नाईक, मंदार शिरसाट,अतुल बंगे, विजय जाधव,रवींद्र जोगल,पप्पू परुळेकर,मंदार ओरसकर,गणेश गावकर,यशवंत गावकर,गुलजार काझी, प्रकाश वालावलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा