डॉ. रामचंद्र शिरोडकर यांचे शैक्षणिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी : निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर
शिरोडा संस्थेमध्ये शिक्षण महर्षी कै. डॉ. शिरोडकर यांचा पुण्यतिथी दिन कार्यक्रम संपन्न..
वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केलेले डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर हे एक थोर व्यक्तिमत्व होते. आपल्या अठ्ठावन्न वर्षांच्या आयुष्यात त्यांनी मुंबई व कोंकणात तब्बल अठरा शैक्षणिक व अन्य समाजपयोगी संस्था उभ्या केल्या. विशेष म्हणजे त्या आजही कार्यरत आहेत. त्यांचे शैक्षणिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन गोवा येथील निवृत्त प्राचार्य तथा साहित्यिक गजानन हरिश्चंद्र मांद्रेकर यांनी शिरोडा येथे बोलताना केले.
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबई संचलित के. एम. एस. डॉ.शिरोडकर कौशल्य विकास संस्था, शिरोडा (सिंधुदुर्ग) येथे शिक्षण महर्षी कै. डॉ. रामचंद्र काशिनाथ शिरोडकर यांचा ७७ वा पुण्यतिथी दिन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अध्यक्ष म्हणून श्री गजानन मांद्रेकर बोलत होते. या कार्यक्रमाला शिरोडा येथील गोगटे कनिष्ठ महाविद्यालयातील अध्यापक तथा कीर्तनकार डॉ.श्रीराम दीक्षित यांची प्रमुख अतिथी होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन तसेच डॉ.शिरोडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अध्यक्ष यांनी अर्पण केली आणि उपस्थितांसमोर शिक्षणासंबंधी आपले विचार व्यक्त केले. तसेच डॉ. शिरोडकर यांचा जीवन पट उलगडला.
या समयी या कार्यक्रमात संस्थेचे ग्रामीण भागातील सहाय्यक कार्यकारी अधिकारी (वित्त) तथा अध्यापक विद्यालय मिठबाव चे प्राचार्य श्री भालचंद्र चव्हाण तसेच संस्थेच्या पालक समितीचे सदस्य तथा खटखटे ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री.राजन शिरोडकर, कार्यवाह श्री.सचिन गावडे तसेच श्रोत्यांमध्ये आजगांव येथील साहित्यिक श्री.विनय सौदागर, आंबा व्यावसायिक श्री.जनार्दन पडवळ, ग्रामस्थ श्री.अनिल गावडे, श्री.मोहन गावडे, श्री.गुरुनाथ नाईक, श्री.सदाशिव परब, खटखटे ग्रंथालयाच्या ग्रंथपाल सौ.प्राची पालयेकर, लिपिक कु.लीना परब इत्यादी मान्यवर व के. एम. एस. डॉ शिरोडकर कौशल्य विकास संस्थेचे शिक्षक/कर्मचारी श्री राजेश शिरगांवकर व श्री अभिजीत नाईक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
