*शब्दगंध साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ कवयित्री सौ. प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुख पावसापरी यावे…!*
प्रत्येकाच्या मनरानी
सुखामृत वर्षावावे
स्वप्नझुले बांधुनीया
मनामनांनी झुलावे
दु:ख सारे झेलताना
नयनांनी सुख व्हावे
वेदनांचा दाह जाण्या
सुख पावसापरि यावे
सुखसागर सरीत
सर्व दु:खांनी बुडावे
थेंबाथेंबांच्या ओळीत
माझ्या सुरांनी जुळावे
सांडलेले घर्मबिंदू
बिजांसम अंकुरावे
नव्या बळाने कष्टण्या
सुख पावसापरि यावे
कष्टलेल्या त्या क्षणांनी
मनी स्वर्ग बहरावे
उन्ह वैशाखी सोसुनी
पावसाने कोसळावे
हरेकाच्या वेदनेला
वाटे समजून घ्यावे
दु:ख असे एवढेसे
सुखसरींत वहावे
जगण्याच्या या उर्मीत
कैक मोदक्षण यावे
मनी सुगंध शिंपण्या
सुख पावसापरी यावे
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
