You are currently viewing किती मधुर मधुर त्या…
Oplus_16908288

किती मधुर मधुर त्या…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*किती मधुर मधुर त्या…*

 

किती मधुर मधुर त्या आठवणी पोटात

किती वर्षे गेली बालपणी खेळात

इंदू नि कुसुम ती सुमन मैत्रिणी चार

देवडीत खेळलो खेळ ते अपरंपार…

 

बाभुळ शेंग ती बांधून हो बोटात

ती छुन्नुक छुन्नुक वाजत हो थाटात

परकर मारूनी काचा तो नऊवार

आम्ही विहिणी विहिणी हसूनच बेजार…

 

कुरमुरे गुळ नि डाळ्या लाह्या गोड

मुटूमुटू खात तो होतसे लाड नि कोड

बाहुला बाहुली धरूनी अंतर्पाट

लग्नाचा उडवून देत असू मग थाट…

 

मग निरोप देता इवल्या त्या बाळीला

लावी ती विहिण मग पदर ही डोळ्याला

नका रडू हो ताई मुलगी सुखात राहील

सुखी संसाराची स्वप्ने पहा ती पाहिल…

 

बोळकी चूल नि पोळपाट ते सारे

ते तसेच आले पुढे पहा सामोरे

तो लुटूपुटीचा खेळ होता किती हो छान

अजुनही तुडवतो आहे, संसाराचे रान….

 

प्रा. सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा