दोडामार्गमध्ये राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी…
४८ प्रकरणे आपसी समंजस्याने निकाली
दोडामार्ग
येथील तालुका विधी सेवा समिती आणि दोडामार्ग वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अनेक प्रलंबित खटल्यांवर पडदा टाकण्यात आला. दिवाणी न्यायालयाच्या आवारात १३ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या विशेष लोकन्यायालयात आपसी समंजस्याने तब्बल ४८ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे. न्यायालयीन कामकाजाचा ताण कमी करण्यासाठी आणि पक्षकारांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांपैकी ४८ खटले यशस्वीरित्या निकाली लागले. यामध्ये ४६ फौजदारी आणि २ दिवाणी खटल्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या फौजदारी प्रकरणांच्या माध्यमातून ९ हजार २०० रुपयांची दंड रक्कम वसूल करण्यात आली आहे. या लोकअदालतीचे कामकाज दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) वाय. पी. बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. खटल्यांच्या निपटान्यासाठी पॅनेल सदस्य म्हणून ॲड. मनोज सावंत यांनी काम पाहिले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोडामार्ग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विशाल नाईक, ॲड. प्रवीण नाईक तसेच न्यायालयातील सर्व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

