मालवण / कट्टा :
वरची गुरामवाडी येथील कै. रोहिणी रमेश गुराम यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला एक महिना लोटूनही अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही. तसेच हत्येमागील कारणही स्पष्ट न झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर दिवसा स्थानिक महिलेची हत्या करणारे आरोपी मोकाट फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र अस्वस्थता असून, मयत रोहिणी गुराम यांचा मुलगाही भीतीच्या छायेत दिवस काढत आहे.
या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाचा सखोल तपास करून तातडीने आरोपींना जेरबंद करावे तसेच मयत रोहिणी गुराम व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी वरची गुरामवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक मा. नयोनी साटम यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने सादर करण्यात आले.
यावेळी कै. रोहिणी गुराम यांचा मुलगा श्री. मंदार गुराम, ॲड. गीता काळे, श्री. महेश यादव, श्री. आनंद रावले यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी लवकरात लवकर आरोपी पकडून कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका यावेळी मांडली.
