मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
शिव उद्योग संघटनेतर्फे महिलांनी स्वतःच्या हाताने, घरगुती पद्धतीने तयार केलेल्या ताज्या व दर्जेदार चपात्या १ जानेवारी २०२६ पासून MMRDA (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) परिसरात रिटेल तसेच होलसेल स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमामुळे महिलांच्या घरगुती उद्योगाला व्यावसायिक स्तरावर नवी संधी मिळणार आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. घरबसल्या उद्योग करून महिलांना सन्मानजनक उत्पन्न मिळावे, यासाठी शिव उद्योग संघटनेने हा अभिनव आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत स्वच्छता, गुणवत्ता आणि परंपरागत चव जपून महिलांनी तयार केलेल्या चपात्या हॉटेल, खानावळ, डबेवाल्यांचे व्यवसाय, कॅन्टीन, कार्यालये, हॉस्टेल तसेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. घरगुती स्वरूपात तयार होणाऱ्या या चपात्यांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.
शिव उद्योग संघटनेतर्फे सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, हॉटेल चालक, संस्था आणि सामाजिक संघटनांना महिलांच्या या उपक्रमाला सहकार्य, पाठिंबा आणि आशीर्वाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सहकार्यामुळे हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि अनेक कुटुंबांचे आर्थिक भवितव्य सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
“महिला स्वावलंबनातूनच सशक्त महाराष्ट्र” या ध्येयाने प्रेरित होऊन शिव उद्योग संघटना पुढील काळातही महिलांसाठी विविध रोजगार व व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस प्रकाश ओहळे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी संपर्क : ९७०२०५८९३०
