*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*काही*…. (शिरोमणी रचना)
काही
शब्द सोबती
जीवना आहे बाकी
अजून उजळतात भाव ज्योती…..
काही
आहे सांगण्यासारखे
मौनात दडलेले आठव
बंद ओठाच्या आड मिटल्यासारखे….
काही
काळजावरील नाव
झेलते आहे अजूनही
पाकळ्यांनी केलेल्या फुलांचे घाव…..
काही
मधुर स्मृतीगंध
जीवनरसातील थेंब मधाचे
काळजाला बिलगलेले घट्ट अनुबंध…..
काही
हलके फुलके
क्षण ठेवले वेचून
मनाच्या मंजुषेत जपलेले
हस-या ढगांचे इवलेसे पुंजके…..
काही
अडथळे ओलांडलेले
यशाच्या खुणा मिरवत
अभिमानाने पुन्हा पुन्हा स्मरलेले….
काही
नितळ प्रसंग
देतात जगण्याची साक्ष
सत्याला सामोरे जाता नि:पक्ष….
.काही
नको उरायला
आयुष्याचं निरभ्र आकाश
डोळे मिटेस्तोवर असावं बघायला….!!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अरुणा दुद्दलवार@✍️
