शेडशाळच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दिव्यांगासाठी विविध स्पर्धा उत्साहात
शेडशाळ / प्रतिनिधी :
शेडशाळ ( ता.शिरोळ ) येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. यातून या विद्यार्थ्यांनी विविध कौशल्यांचे दर्शन घडवत उपस्थितांची वाहवा मिळवली.
सध्या सर्व शाळांमध्ये सुरु असलेल्या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा होत आहेत. यामध्ये सर्व विद्यार्थी अत्यंत हिरीरीने सहभाग घेऊन आपल्यातील कौशल्यांचे प्रदर्शन करत आहेत.अशावेळी सर्व विद्यार्थ्यांसोबत जे स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत असे दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये माञ काही अंशी नैराश्य येत असते.
त्यांची हीच समस्या लक्षात घेऊन इतर विद्यार्थ्यांसोबत त्यांनाही विविध स्पर्धेत सहभागी होऊन खेळातील कौशल्यांचे प्रदर्शन करुन त्यांच्या मनातील नैराश्यता दूर होऊन नव्यानं आत्मविश्वास वाढावा ,या उद्देशाने शेडशाळ येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सहकार्याने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये धावणे , लिंबू-चमचा, रांगोळी, चित्रकला या स्पर्धेत सर्व दिव्यांग विद्यार्थी अत्यंत हिरिरीने सहभागी झाले होते. तसेच सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांचे हिमोग्लोबिन,वजन, उंची अशी विविध वैद्यकीय तपासणी करुन आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले.यासाठी आरोग्य विभागाच्या शेडशाळ येथील आरोग्य अधिकारी डॉ.प्रियंका दशवंत यांचे अनमोल सहकार्य लाभले. दिव्यांग विद्यार्थी आफान पानारी याने सुरपेटी वादनातून सुरांच्या संगीत कलेचे सुंदर सादरीकरण केले.
या सा-या धडपडीतून आपल्यालाही स्पर्धेत सहभागी होता आले याचे समाधान सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर निखळ , निरागस आनंदातून दिसून आले. यासाठी न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे, सौ. पद्मश्री पाटील, रियाज जमादार, संगीता भोसले, लता गडगे, पद्मावती घाट, धनश्री पवार, वैशाली टारे, संतोष माने ,मनोज पासोबा, शितल हळींगळे, गणेश खिलारे, सत्यजित पाटील यांचे सहकार्य लाभले.यावेळी वैद्यकीय तपासणी पथकातील अधिकारी ,शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
