महावितरणचे 2285 कंत्राटी कामगार कायम;
13 वर्षांच्या लढ्यानंतर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी दिली माहिती
महावितरणमधील 2285 कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय अखेर जाहीर झाला आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संबंधित – भारतीय मजदूर संघ) यांनी 2012 साली दाखल केलेल्या याचिकेवरून सुरू झालेल्या 13 वर्षांच्या न्यायलढ्याला मोठे यश मिळाले आहे. 5656/2012 या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने प्रकरण औद्योगिक न्यायालयाकडे वर्ग केले होते. त्या खटल्यात मा.न्यायाधीश एस. झेड. सोनभद्रे यांनी 17 जून रोजी महत्त्वपूर्ण अवॉर्ड घोषित केला होता.
हा अधिकृत अवॉर्ड बुधवार, 10 डिसेंबर रोजी कामगार उपायुक्त मा.श्री. ल.य. भुजबळ यांनी संघटनेला सुपूर्द केला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपसरचिटणीस राहुल बोडके, संघटन सचिव उमेश आणेराव आणि कोषाध्यक्ष सागर पवार उपस्थित होते.
निकालातील महत्त्वाचे मुद्दे
1. महावितरणमधील कंत्राटी कामगारांना प्रत्यक्ष व कायम कामगाराचा दर्जा देण्यात यावा.
2. कंत्राटदार ही व्यवस्था नाममात्र व बनावट असल्याचे न्यायालयाने स्पष्ट मान्य केले.
3. 2012 पासून आजपर्यंत कायम कामगारांप्रमाणे वेतन, भत्ते व इतर सर्व लाभ फरकासह देण्याचा आदेश.
4. सहा महिन्यांत लाभ न दिल्यास प्रलंबित रकमेवर 5% व्याज देणे बंधनकारक.
या निकालामुळे कंत्राटीकरणाच्या चुकीच्या प्रवृत्तीवर मोठा लगाम बसेल आणि मुख्य नियोक्ता तसेच कंत्राटदार दोघांनाही जबाबदार धरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या खटल्यात कामगारांकडून 10 तर व्यवस्थापनाकडून 2 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले.
या संपूर्ण लढ्यात संघटनेच्या वतीने अँड. विजय पांडुरंग वैद्य, अँड. बाळासाहेब देसाई आणि अँड. शिरीष राणे यांनी बाजू मांडली. व्यवस्थापनाची बाजू अँड. एल. आर. मोहिते यांनी पाहिली.
संघटनेची प्रतिक्रिया
संघटनेचे मार्गदर्शक मा. अण्णा देसाई म्हणाले, “न्यायदेवता न्याय देते यावर आता राज्यातील सर्व कंत्राटी कामगारांचा विश्वास अधिक दृढ होईल.”
अध्यक्ष निलेश खरात यांनी भावना व्यक्त करताना म्हटले, “हा ऐतिहासिक विजय आहे. कंत्राटी कामगारांची चेष्टा करणाऱ्यांना हा निकाल चपराक आहे. भारतीय मजदूर संघावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विजय झाला.”
सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी नमूद केले, “हा निकाल देशभरातील कंत्राटी कामगार चळवळीला नवे बळ देणारा मैलाचा दगड आहे.”
संपूर्ण माहिती जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी दिली.
