पालकमंत्री नितेश राणेंची वचनपूर्ती;सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर
* शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश
* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
*मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने केला होता पाठपुरावा,प्रत्येक बैठकीत नुकसान भरपाईचा मांडला होता विषय
कणकवली : यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देत लवकरात लवकर भरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भात-नाचणी नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ८६ लाख ९ हजार रुपये एवढे अनुदान नुकसान भरपाई पोटी मंजूर झाले आहे. यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत सातत्यपूर्ण आग्रही मागणी केली होती. शंभर टक्के अनुदान नुकसान भरपाई पोटी मिळावी असा हट्टच धरला होता. त्यानुसार शासनाने ही मागणी मान्य केली आहे.आणि ४ कोटी ८६ लाख ९ हजार रुपये रक्कम दिली आहे.
यावर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असला, तरीही ऐन भात कापणीच्या हंगामातच सातत्याने पाऊस पडत होता. त्यामुळे कापलेल्या भाताला अंकुर येणे, उभ्या पिकाला अंकुर येणे यासारखे प्रकार घडले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाताची कापणी करूनही त्याचा उपयोग न होता, भात कुजून जाण्याचा प्रकार घडला होता. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने पालकमंत्री नीतेश राणे यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
दरम्यान, ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या या भात नुकसानीबाबत पंचनामे व सर्व प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासनाकडून २८ नोव्हेंबर २०२५ रोजी शासनाकडे भरपाईसाठीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार आता शासनाने ही भरपाई मंजूर केली आहे. यात जिल्ह्यातील १८ हजार ३७१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यात ४६३६.४७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता ४ कोटी ८ लाख ६९ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबतची कार्यवाही होणार आहे.
दरम्यान जिल्ह्यातील तालुका निहाय नुकसान भरपाई पुढील प्रमाणे,दोडामार्ग तालुक्यासाठी मंजूर अनुदान 13 लाख 42 हजार 220 रुपये सावंतवाडी साठी 74 लाख 32 हजार 415 रुपये अनुदान मंजूर झाले आहे.वेंगुर्ला तालुक्यासाठी 26 लाख 53 हजार 90 रुपये कुडाळ तालुका दोन कोटी 21 लाख 38 हजार 310 रुपये एवढे अनुदान मंजूर झाले आहे.तर मालवण तालुक्यातील 58 लाख 22 हजार 445 रुपये,कणकवली तालुक्यासाठी साठी 9 लाख 41 हजार 960 रुपये देवगड तालुक्यातील 4 लाख 55,175 रुपये तर वैभववाडी तालुक्यातील 82,990 असे जिल्ह्यातील एकूण 4 कोटी 86 लाख 9 हजार रुपये एवढे अनुदान मंजूर झाले असून हे सर्व अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा होणार आहे.
