*प्रा. सुनंदा गिरीश पाटील- गझलनंदा यांच्या गझलेचे शोभा वागळे यांनी केलेलं रसग्रहण*
प्रा. सुनंदा गिरीश पाटील, म्हणजेच गझल सम्राट सुरेश भट साहेबांच्या मानस कन्या ‘गझलनंदा’ या भट साहेबांनी दिलेल्या नावानेच ओळखल्या जातात.
मुळाच्या नागपूरच्या असून सध्या ठाणे जिल्हात, मीरा रोड पूर्व येथे राहतात. त्या एम.ए. एम. एड. असून हिन्दी कोविद, प्राज्ञ आहेत. काही काळ नागपूरला एल. ए. डी. महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापकीही केलेली आहे. त्यांनी बँकेत क्लर्क, पुढे ऑफिसर ते उच्चअधिकारी अशी पदं घेत आज बँकेची आधिकारी (उपप्रबंधक) म्हणून निवृत्त झालेल्या आहेत.
१९७१ /७२ पासून त्या गझल लेखन करत आहेत. मात्र १९७९ पासून त्यांना कॉलेज मध्ये असतानाच भट साहेबांचे खरेखुरे गझल मागदर्शन लाभले. भट साहेबांनी दिलेल्या ‘गझलनंदा’ या नावाने त्या गझल लेखन करत आहेत. गझलेचा त्यांचा अभ्यास जवळ जवळ पन्नास वर्षांचा आहे. त्या उत्कृष्ट गझलकारा असून त्यांच्या गुरूंची आज्ञा म्हणूनच त्या सध्या गझल शिकणाऱ्यांस गझलतंत्राचे मार्गदर्शनाचे काम करीत आहेत. १९७३ ते २००३ हा नागपूर येथील वास्तव्याचा (काही वर्ष अपवादात्मक) सुवर्ण काळ होता असं त्या सांगतात .
रेणुका गझल कार्यशाळेच्या त्या प्रमुख मार्गदर्शक आहेत.
अनेक समुहाची व संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भुषविली आहेत.
भट साहेबांनी दिलेले नाव ‘गझलनंदा’ त्यांनी सार्थ करून दाखवले आहे.
त्यांची १५ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. जशी काव्य, कथा, गझल संग्रह, कादंबऱ्या . विविध विषयांवर लेख वगैरे बऱ्याच वृत्तपत्रातही प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या बऱ्याच पुस्तकांस पुरस्कार ही प्राप्त झाले आहेत. सावली अंबराची , माझा विचार आहे , गझल प्रेमऋतूची हे ३ गझलसंग्रह विशेष नावाजलेले आहेत . तसेच साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याच्या गौरवासाठी त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. महाराष्ट्र शासनाचेही अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत . शिवाय राज्य / राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्या सन्मानीत झाल्या आहेत . एक बहुआयामी वक्ता / शिक्षक / समाजसेवक / लेखक / निवेदिका अशी त्याची बहुआयामी ओळख आहे .
आजच्या रसग्रहणासाठी मी सुनंदा ताईची ‘आनंदकंद’ अक्षरगणवृत्तातली ‘माझा विचार आहे’ ही गझल घेतली आहे.
माणसाच्या जीवनात चढ -उतार, सुख -दु:ख, बरे-वाईट, संघर्ष येतच असतात त्या सर्वांवर मात करणे हेच ध्येय असायला हवे. अशाच आशयाची ‘माझा विचार आहे’ ही ताईंची गझल आपण प्रथम पाहुया :-
*गझल:-*
*माझा विचार आहे*
अस्तास सूर्य जाणे अंतीम सार आहे
मज नेमके कळाले अंधार फार आहे
सांभाळले घराला जैसे जमेल तैसे
मज शेवटी कळाले मी मात्र भार आहे
जे घाव सोसण्याला हासून बोलले मी
कानात शब्द आले ‘नखरेल नार आहे ‘
परजून शस्त्र होते डोळ्यात वासनांचे
मी ओळखून गेले हा एक वार आहे
भावास सोबतीला घेऊन चालले मी
पुसले मला जगाने ‘हा कोण यार आहे’
कुल्टा कुणी म्हणावे निंदा कुणी करावी
शस्त्राहुनी जगाच्या जिव्हेस धार आहे
जेथे सनातन्यांनी मरणे कठीण केले
तेथे जगावयाचा माझा विचार आहे
— ‘गझलनंदा’ प्रा. सुनंदा पाटील
8422089666
*अस्तास सूर्य जाणे अंतीम सार आहे*
*मज नेमके कळाले अंधार फार आहे*
गझलेचा मतलाच किती सार्थ आहे बघा. प्रकृतीच्या नियमानुसार जे होणार ते होतच असते. तिथे आपण काही करू शकत नाही. पण त्यातून वाट कशी शोधायची, मार्ग कसा काढायचा हा ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबून असते.
सूर्याचे उगवणे आणि मावळणे हे ठरलेलेच आहे. सूर्य अस्तास गेला की नंतर हळूहळू अंधार हा निश्चित होणारच असतो. पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती फिरत असते आणि त्यामुळे आपणास दिवस व रात्रीचा अनुभव मिळतो. सूर्याचे मावळणे अंतीम सत्य आहे आणि तो नसतो तेव्हा अंधार होणार हे ही तितकेच खरे असते. त्या अंधारावर मात करणे, दिव्यांची सोय करणे, माझे कर्तव्य आहे आणि त्याची तजवीज मला अगोदरच करून ठेवायला हवी. उजेडाची सोय न करता मी गप्प बसून राहिलो तर माझ्या समोर अंधारच असेल ह्याची जाणीव ठेवून मी व्यवस्थापन करायलाच हवे. जे नक्की घडणार आहे व ते मला माहीत आहे तर त्याची व्यवस्था करणे माझे कर्तव्यच आहे असेच गझलकारा सांगतात.
आता दुसरा शेर :-
*सांभाळले घराला जैसे जमेल तैसे*
*मज शेवटी कळाले मी मात्र भार आहे*
काही जणांच्या नशिबात काही कारणाने किंवा परिस्थितीमुळे लहान वयात सुद्धा घराची जबाबदारी अंगावर पडते आणि ती निभावण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात.
आई बाबा अचानक वारले तर मोठ्या भाऊ किंवा बहिणीवर जबाबदारीचे ओझे पडते. माझ्या नशिबात नाही, माझ्या भावंडांना तरी मिळू दे, म्हणून मोठा भाऊ आटापिटा करून सगळ्यांचे भले करतो. पण नंतर त्याचीच भावंडे आत्मनिर्भर झाली की भावाने केलेले उपकार विसरून आत्ममतलबी बनतात. भाऊ वयस्कर झाल्यावर तो अडाणी समजून त्याचा तिरस्कार करतात. शेवटी तोच भाऊ त्यांना नकोसा वाटतो.
त्याच प्रमाणे गरीब आईवडील काबाड कष्ट करून मुलांना शिकवतात. ते स्वतः अर्ध पोटी राहून, साधे जगणे जगून, शेतजमीन विकून मुलांना उच्च शिक्षित करतात. पण मुले मोठी झाली की हेच आईवडील त्यांना भार वाटू लागतात. त्यांना वृद्धाश्रमात टाकतात. काही जण त्यांना आईबाप सुद्धा मानायला तयार नसतात. आपलीच माणसे उपकारांची जाण न ठेवणारी असल्यावर आणि आपल्याला आता भार समजतात हे कळल्यावर त्या माणसाचे दु:ख ते किती म्हणावे असेच गझलकारास वाटत असावे.
तिसरा शेर :-
*जे घाव सोसण्याला हासून बोलले मी*
*कानात शब्द आले ‘नखरेल नार आहे*
काही लोकांना उणे अधिक बोलण्याची सवय असते. आपल्याच घरातली माणसे सुद्धा अशी टिंगळ- टवाळी करत असतात. ऐकणारा माणूस सुस्वभावी असला तर त्यांचे बोलणे मनाला लावून न घेता सगळे हसण्यावारी नेऊन सोसत असतो. मनाला घाव देणारे शब्द सुद्धा सोसत असतो. पण सोसत आहे म्हणून काहीही कसे सोसणार? जर कुणी ‘नखरेल नार’ म्हटले तर ते एकून घेणे कितपत योग्य असेल? मजा मस्करी इतपत योग्य आहे पण चारित्र्यावर शिंतोडे उडवत असले तर ते सहन करणे अशक्यच असे गझलकारास सांगावेसे वाटते.
चौथा शेर:-
*परजून शस्त्र होते डोळ्यात वासनांचे*
*मी ओळखून गेले हा एक वार आहे*
आजच्या वास्तवावर लिहिलेला हा शेर आहे. आज काही माणसांनी विकृतीचा कळस गाठलेला आहे. त्यामुळे स्त्रियांना, मग ती चिमुरडी असो किंवा वयस्कर, कधी हे नराधम त्यांच्यावर घाव घालीतल हे सांगता येत नाही.
ते फक्त स्त्रीला एक भोग वस्तू म्हणूनच तिच्याकडे पाहत असतात.
देवाने स्त्रियांना एक वेगळे ज्ञानेंद्रिय दिलेले आहे. ती जर थोडी चाणाक्ष असेल तर ती परपुरुषाच्या वासना भरलेल्या डोळ्यांचे शस्त्र बरोबर ओळखू शकते आणि सतर्क राहून त्या परजून शस्त्रांच्या वारा पासून स्वतः चे रक्षण करू शकते. आज समाजातील विकृतांपासून संरक्षणास स्त्रियांनी सदैव सतर्क राहायला हवे आणि तसेच ज्युडो कराटेचे शिक्षण घेऊन, प्रतिकार करून त्या विकृतास अद्दल घडवायला हवी असेच गझलकारास या शेरातून सांगायचे असेल.
पाचवा शेर:-
*भावास सोबतीला घेऊन चालले मी*
*पुसले मला जगाने ‘हा कोण यार आहे*
पुरूष आणि स्त्रीकडे पाहाण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळाच आहे.
जर एखादी तरूण विधवा अथवा परित्यक्ता स्त्री स्वतःच्या बंधूच्या बरोबरीने रस्त्यावरून जात असलेली दिसली तरी समाजातले काही लोकांची विचारसरणी एवढी कमकुवतीची असते की, ते सरळ तिला तुझा हा यार आहे कां? असे विचारायला मागे राहत नाही.
पक्के न जाणता,खात्री करून न घेता ‘उचलली जिभ लावली टाळ्याला’ अशा प्रवृत्तीची माणसें ही समाजात असतात आणि अशा लोकांमुळे त्या भाऊ बहिणीला किती त्रास होत असावा असेच गझलकारास वरील शेरात सांगायचे असेल.
सहावा शेर:-
*कुल्टा कुणी म्हणावे निंदा कुणी करावी*
*शस्त्राहुनी जगाच्या जिव्हेस धार आहे*
शस्त्राने इजा केली तर तो घाव काही दिवसांनी बरा होतो. पण काही लोकांचा जिभेचा पट्टा अथवा शाब्दिक वार हा अतिशय घातक असतो. तो काळजात रुतून घायाळ करत असतो. बोलणारा तोंडाला येईल ते बोलत असतो. त्याला काही ताळतंत्र नसतो, पण ते शब्द एवढे धारदार असतात की त्यांच्यात शस्त्रापेक्षा जिभीलाचा जास्त धार असते असेच गझलकारास म्हणायचे आहे.
शेवटचा शेर:-
*जेथे सनातन्यांनी मरणे कठीण केले*
*तेथे जगावयाचा माझा विचार आहे*
हा शेवटचा शेर मला खूप आवडला. आपल्या समाजात काही कर्मठ लोक म्हणजे आपले तेच बरोबर समजणारे व दुसऱ्यास ही तसेच वागा किंवा करा असा आदेश देणारे लोक आहेत.
शाश्वत धर्माचे पालनकर्ते, शाश्वत तत्त्वांवर विश्वास ठेवणारे आणि त्यांचे आचरण करणारे लोक यांनी ‘आमच्या रिती परंपरेनुसार तुम्हीही वागा’ अशी जबरदस्ती दुसऱ्यावर करणे बरोबर नाही. तरी ते लोक हट्टास पेटलेले असतात. अशा समाजात त्या सनातन्यांनी मरणे कठीण केले आहे तिथे जगणे कसे असेल विचारूच नका. पण गझलकाराही काही कमी नाहीत! त्या ही तेवढ्याच निर्धाराने आपल्या निश्चयावर, निर्णयावर ठाम आहेत. त्या शाश्वत तत्त्वांचा विरोध करून ज्या सनातन्यांनी मरणे कठीण केले तिथेच राहून जगण्याचा त्याचा विचार आहे. त्यांच्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत या शेरातून स्पष्ट होत आहे.
ताईंची ही गझल बरेच काही शिकवून जाते. समाजातील वेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांबरोबर राहून निभावणे अतिशय कठीण असते. तरी माणसाने आपली स्वतःची तत्वे राखून समोरच्याशी कसे वागावे याचा संदेश देणारे शेर ही गझलेत समाविष्ट झालेले आहेत. आपले आत्मबल व निर्धार पक्का ठेऊन आपण समोरच्या माणसाचा सामना कसा करावा हे सांगणारी ही गझल आहे.
प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळ्या तऱ्हेने ही जर गझल वाचली तर त्यांना तसे वेगवेगळे आयाम कळतील . उदाहरणार्थ – आयुष्यभर कष्ट केलेली आई वडील यांचे दुःख वेगळे – मोठ्या भावांनी किंवा बहिणींनी धाकट्यांचे सगळं केलं पण शेवटी माझ्या नशिबात काय हा एक भाग येतो . एखादा शिक्षक मार्गदर्शक शिकवून जातो . पण त्याचे विद्यार्थी त्याला मानत नाहीत . हाही भाग इथे येतो . पण महत्त्वाचं म्हणजे एखादी तरुण विधवा जर असेल , तिची कल्पना जर या ठिकाणी केली तर हे शेर आणखी बोचरे होतात . आणि त्यामुळेच कालातीत असे हे सर्व शेर आहेत . यातील
*भावास सोबतीला घेऊन चालले मी*
*पुसले मला जगाने हा कोण यार आहे ?*
हा शेर सुरेश भट साहेबांचा विशेष आवडता होता असं माई स्वतः सांगतात .
या गझलेत
*सार, फार, भार, नार, वार, यार, धार आणि विचार* असे कवाफी आहेत.
आणि *आहे* ही रदीफ घेतली आहे.
धन्यवाद 🙏🌹
शोभा वागळे
मुंबई.
8850466717
# गझलनंदा
