You are currently viewing यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०२५ ‘युसुफ मेहेरअली सेंटर, तारा (रायगड)’ यांना जाहीर

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०२५ ‘युसुफ मेहेरअली सेंटर, तारा (रायगड)’ यांना जाहीर

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी कृषी, औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन व प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान व तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक व सामाजिक विकास, तसेच मराठी साहित्य, संस्कृती, कला आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्ती किंवा संस्थेस “यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक” प्रदान केले जाते. या पारितोषिकात दोन लाख रुपये रोख रक्कम व मानपत्राचा समावेश आहे.

यावर्षी पारितोषिक निवड समितीने “युसुफ मेहेरअली सेंटर, तारा, जिल्हा रायगड” या संस्थेची निवड केली आहे. ही संस्था ग्रामीण विकास क्षेत्रात आरोग्य सेवा, शिक्षण, कृषी, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि सूक्ष्म वित्त या विविध उपक्रमांद्वारे उल्लेखनीय कार्य करीत आहे. ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दिलेल्या या बहुआयामी योगदानाची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार मा. यशवंतराव चव्हाण यांच्या ४१व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित समारंभात चव्हाण सेंटरचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल अशी माहिती यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस हेमंत टकले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा