You are currently viewing साळीस्ते येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटण्याचा तपास वेगात

साळीस्ते येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटण्याचा तपास वेगात

साळीस्ते येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटण्याचा तपास वेगात; पोलिसांचे पथक बेंगलोरकडे रवाना

कणकवली :

मुंबई-गोवा महामार्गालगत साळीस्ते येथे गुरुवारी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. शरीरावर धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या खुणा असल्याने हा खून असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला होता. तपासाच्या धाग्यांवरून पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला असून, तो मृतदेह कर्नाटकातील बेंगलोर येथील श्रीनिवास रेड्डी (वय ५३) यांचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ओळख निश्चित करण्यासाठी पोलिसांचे पथक बेंगलोरला रवाना झाले आहे.

ही हत्या तीन दिवसांपूर्वी झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे. गुरुवारी दुपारी साळीस्ते येथील गणपती सान्याच्या पायरीवर हा मृतदेह आढळला. मृतदेहावर सुमारे १३ ते १४ धारदार शस्त्रांनी वार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, तसेच पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत करण्यात आले.

दरम्यान, त्याच दिवशी दोडामार्ग येथील तिलारी वसाहतीजवळ पुलाखाली रक्ताने माखलेली एक कार आढळून आली. कार सुस्थितीत असली तरी आतील भागात रक्ताचे सडे होते. फॉरेन्सिक पथकाने नमुने गोळा केले असून, कारचा चेसिस आणि इंजिन नंबर आंध्र प्रदेशमधील असल्याचे समोर आले आहे.

या कारचा आणि साळीस्ते येथे सापडलेल्या मृतदेहाचा काही संबंध आहे का, याबाबत पोलीस तपास सुरू असून, पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा