You are currently viewing जाता रवी अस्ताला

जाता रवी अस्ताला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम लेख*

 

*जाता रवी अस्ताला*

 

रात्रीचा प्रहर संपता

सोनप्रभा दवात न्हाते

उदयस्थानावर प्रकाशाचे

दीर्घ चुंबन घेऊन जाते

 

अरे तुझ्या आगमनाने…! अरे हो तुझ्याच आगमनाने… आकाश सोनेरी रंगाने लाल होते… गर्द निळाइत चढलेला सोनेरी रंग आणि त्यातून पसरलेल्या लाल छटा … अरे पण अजून नवीन दिवसाची कहाणी सांगायची आहे.

टेकड्या धुक्याची ओलसर मऊ दुलई पांघरून शांत उभ्या आहे, डोंगर सकाळच्या सौम्य सोनकिरणांच्या भरतीमध्ये स्नान करत आहेत. हळुवारपणे डोळे उघडून गवतफुल वाऱ्यावर डुलत आहे. वेलींवर उमलणाऱ्या फुलांचा मधुगंध प्राशन करण्यासाठी भ्रमर लडिवाळपणे गुंजन करत आहे. पक्षी घरट्या बाहेर डोकावत पंखांची फडफड करत आहेत जणू ते उंच भरारी घेण्यासाठी आकाशाचाच वेध घेत आहेत…

तुझ्या उदय स्थानावर सूर्योदयाचे सौंदर्य हे नवीन सुरुवातीचे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. सोनेरी प्रकाश संपूर्ण सृष्टीत आशा आणि शांती पसरवतो. तुझ्या असंख्य सोनहातांनी सृष्टीच्या नुतनीकरणाचे प्रतिनिधित्व करत संजीवनी पाजतोस… उदय स्थानावरील डोंगर टेकड्या शांतता आणि स्थिरतेचे प्रतीक आहेत. तुझ्या ओल्या अलिंगनात अवनी आंघोळलेली असते. तिच्या भावना तुझ्या स्पर्शाने पुलकित झालेल्या असतात. ती तुझ्या कानात भावविभोर होऊन गुणगुणताना तू वर चढतोस थेट दुपारपर्यंत पोहोचतोस आणि जग जागृत होते,. सारे मानवी जीवन चैतन्याने रसरसते. तुझ्या तेजस्वी प्रकाशाने तेजोमय होते. विरळ होणारे धुके भीती दूर करते.

उदयी होणारी तुझी सूर्यशक्ती स्पष्टता दर्शविते आणि त्यातील शांत चमक आपल्याला वर्तमान क्षणाला खुल्या अंतःकरणाने. स्वीकारण्याची आठवण करून देते .. आणि एका नवीन दिवसाचा आश्वासक संदेशही देतोस….

संध्याकाळी मात्र सायंकाळ रम्य वाटत असली तरीही तुझ्या सहित लाखो पावले दृत गतीने आपापल्या घरी परतताना दिसतात. दिवसभर श्रम केलेले असले तरीही त्या पावलांना जणू वाऱ्याचे पंख लाभलेले असतात… कारण त्यामागे ओढ असते घराकडे परतण्याची… वेगाने घरट्याकडे परतणाऱ्या पक्षांच्या रांगा दृष्टीस पडतात.. तीच ओढ त्यांच्या पंखात उतरलेली असते… अरे दिवसभर प्रकाश दानाचे काम करून तुही थकला असशील ना..? अस्ताला जाणाऱ्या या सहस्त्र रश्मीलाही कशाची तरी ओढ लागली आहे का..? अरे क्षितिजा पलीकडे किती वेगाने जात होतास तू..? तुझे ते केशरात बुडालेले लाल वर्तुळाकार तेजोगोल क्षितिजा पलीकडे गेले तरीही मागे आकाशात उरला लाल रक्तीमा..!

संधीप्रकाश….

क्षितिजावर मावळतीचा केशरी हा थाट

बुडण्याआधी झाली धुसर ती वाट

शुभ्र आसवानी भिजतो तो काट

झेलतो खडक होऊनी ती लाट

 

तिन्हीसांजेचा संधीप्रकाश म्हणजे दिवस आणि रात्र यांना जोडणारा दुवा… त्यामुळे या दोघांच्यातील साऱ्या चांगल्या वाईट गोष्टी त्यात एकवटतात. संध्याकाळच्या या संधी प्रकाशात अनंत संध्यावेळा एकवटल्या आहेत या सर्व वेळांची मिळून झाली आहे ती एक दीर्घ संध्याकाळ…. सूर्यास्त होत असतो तेव्हा ती रम्य सायंकाळ खरंच रम्य असते का..?

सूर्यास्त होत असताना सृष्टीवर दाटून आलेले गहन गहिरे औदासिन्य… दूर दूर पर्यंत पसरत गेलेली जडता… स्तब्धता.. आणि निःशब्द एकटेपणा.. या एकाकीपणात जाणवणारी चिरंतन सोबत करणारे गूढ पण उदात्त दुःख आणि अशा दुःखातच पटणारी त्या अद्भुत शक्तीच्या अस्तित्वाची ओळख… त्या अद्भुत शक्तीचे अवतरण संध्याकाळी साऱ्या सृष्टीमध्ये होते. एक विलक्षण समाधी अवस्था निर्माण होते. बाहेरची उदास गूढ चित्रे आत मधला अर्थ खेचून घेतात, एका उत्कट,अधीर प्रतीक्षेचाच भाग बनतात. संध्याकाळच्या धूसर वातावरणात वेदना पुन्हा पुन्हा जागी होते कारण फक्त याचवेळी स्वतःतून वाहणाऱ्या प्रवाहाच्या उगमापर्यंत जाऊ शकतो. प्रत्येक अनुभूतीतून.. प्रत्येक आठवणीतून… अस्तित्वाच्या प्रत्येक कणाकणातून… तिथे पोहोचण्याची तळमळ एक आर्त परंतु मूक हाक मारते ती फक्त या संधीप्रकाशातली तिन्हीसांजच……

पाहता पाहता संधी प्रकाश संपतो आणि तमीस्त्र आपले अधिपथ्य गाजवू लागते. त्याचवेळी तेवणारी एक तेजोमय पणती काळोखाला पराजित करून प्रकाशमान होताना दिसते. आणि मग त्याच वेळी आकाशात एका मागून एक असंख्य चांदण्या चमचम करू लागतात…..

 

 

सौ. स्नेहा धोंडू नारिंगणेकर

शिरोडा सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा