३ मृत, १ गंभीर तर ४ जणांचा शोध सुरू
वेंगुर्ला :
शिरोडा-वेळागर समुद्रकिनारी आज दुपारी सुमारे ४:४५ वाजता भीषण दुर्घटना घडली. आठ पर्यटक समुद्रात बुडाल्याची घटना घडली असून, त्यापैकी चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला अत्यवस्थ असून तिला शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित चार पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथक तसेच प्रशासकीय यंत्रणेमार्फत सुरू आहे.
समुद्रातून बाहेर काढलेल्यांमध्ये इसरा इम्रान कित्तूर (१७, लोंढा, बेळगाव) ही वाचली आहे. तर श्रीमती फरहान इरफान कित्तूर (३४, लोंढा, बेळगाव), इबाद इरफान कित्तूर (१३, लोंढा, बेळगाव) आणि नमीरा आफताब अख्तर (१६, अल्लावर, बेळगाव) या तिघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अजूनही चार पर्यटक बेपत्ता आहेत. त्यात इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (३६, लोंढा, बेळगाव), इक्वान इमरान कित्तूर (१५, लोंढा, बेळगाव), फरहान मोहम्मद मणियार (२०, कुडाळ, सिंधुदुर्ग) आणि जाकीर निसार मणियार (१३, कुडाळ, सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे.
घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा दाखल झाली असून स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
