You are currently viewing देवगड मत्स्य महाविद्यालयाला हिरवा कंदील

देवगड मत्स्य महाविद्यालयाला हिरवा कंदील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता; पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

सौंदाळे येथे होणार महाविद्यालयाची स्थापना

देवगड :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याला शैक्षणिक क्षेत्रात नवे दालन खुलं होणार आहे. मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला आहे. यामुळे कोकणातील मच्छीमार बांधवांना आधुनिक शिक्षणाची नवी दिशा मिळणार असून, जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसायाला नवचैतन्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामागे मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आहे. २६ ऑगस्ट रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या संदर्भातील इतिवृत्तावर चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता देत महाविद्यालय स्थापनेला संमती दर्शवली.

राज्यात नवीन शासकीय महाविद्यालयांना परवानगी न देण्याचा धोरणात्मक निर्णय लागू असतानाही सिंधुदुर्गात मत्स्य महाविद्यालय सुरू करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळाली आहे. महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत येणार असून देवगड तालुक्यातील सौंदाळे येथील वन व महसूल खात्याच्या जागेत उभारले जाणार आहे. इमारत व सुविधा उभारणीसाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या महाविद्यालयामुळे किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छीमारांना व उद्योजकांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि व्यवसायविषयक प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. देवगडसारख्या समुद्रकिनारी तालुक्यात मत्स्य शिक्षण केंद्र स्थापन होत असल्याने खऱ्या अर्थाने किनारपट्टी भागाला न्याय मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा