*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित काव्याचे कवयित्री ऐश्वर्या डगावकर यांनी केलेले रसग्रहण*
*भावार्थ*
शब्द भुकेलेले क्षणाक्षणाला
शोधीत भावार्थ भक्तीतला
मुग्ध भावनांची उधळण सारी
लुभावते साऱ्याच चराचराला…
तुझ्याविना स्पंदनेच अचेतनी
सांगू मनातले , कुणाकुणाला
झुलविती सारेच स्पर्श अबोली
तू चैतन्यी ऋतूऋतू भारलेला….
जळीस्थळी काष्ठीपाषाणी तू
ओढ तुझी लागली आत्म्याला
व्यर्थची सारेच भास मृगजळी
अंती जाणवते मर्त्य मनाला….
*************************
✒️✒️✒️ *विगसा* ✒️✒️✒️
*वि.ग. सा. यांच्या भावूक रचने बद्दल दोन शब्द….*
भक्तीची भावनाच इतकी उत्कट आहे की हृदयातील शब्द सुद्धा तिचे वर्णन करण्यासाठी उत्सुक असतात.अशी ही निर्मळ निरागस मुग्ध भावना सा-या सृष्टीला सुद्धा सदा मोहवत असते.
कवी म्हणतात त्याच्याशिवाय हृदयाची स्पंदने हा श्वासोच्छ्वास मृतप्राय आहे.असे जगणे काय कामाचे ज्यात ईश्वर भक्तीला जागाच नाही.पण हे कसे आणि कुणाकुणाला समजावून सांगू
म्हणजेच ही भावना अबोल आहे सर्व स्पर्श निव्वळ भ्रम आहे.फक्त त्याच्या जाणीवेत केवळ चैतन्य आहे जो सा-या चराचरात व्याप्त आहे
सर्व जग फक्त त्यानेच व्यापले आहे.आणि आता त्याला भेटण्याची ओढ जीवाला लागल्याने सारं काही मोहमाया, नातीगोती, प्रेम वगैरे फक्त मृगजळ आहे.त्यामुळे सरतेशेवटी हेच कटूसत्य मानवी मनाला जेव्हा कळते तेंव्हा तो ईश्वर चिंतनात इतका रंगून जातो की त्याला उठता बसता,जळीकाष्ठी एवढंच नव्हे तर पाषाणात देखील त्याला ईश्वराचाच भास होतो.
ही तल्लीन अवस्था म्हणजेच ईश्वराच्या जवळ पोचण्याची अंतिम पायरी आहे हे कवीवर्यांना सांगायचे आहे.
वि.ग.सां.ची प्रत्येक कविता ही जीवनदृष्टी देणारी असते यात शंका नाही.अतिशय सुंदर कविता.
*सौ ऐश्वर्या डगांवकर पुणे*
