*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुशीला हेमचंद्र पिंपरीकर लिखित अप्रतिम लेख*
*प्रवास मनाचा नि*
*तनाचा*
प्रवास मानवी जीवनाचा सुरू होतो आईच्या गर्भापासून .
तिच्या रक्ताचे, देहाचे,मनाचे संस्कार सोबत घेऊन या प्रवासाला सुरुवात होते. नंतर होतात कुटुंबाचे, शैक्षणिक जीवनातले, सामाजिक घटनांचे संस्कार.त्यातूनच जडणघडण होते माणसाची.या संस्कारांच्या संगतीने आणि त्यातल्या त्याच्यावर प्रभाव करणा-या स्वभाव मूल्यांनुसार व्यक्ती, सेवाभावी, स्वार्थी वा निस्वार्थी आचरण करत असते.
जीवनाचा प्रवास करतांना त्याला सुखदुःखांचा सामना करावा लागतो.जो दुःखांची वजाबाकी सुखाच्या बेरजेत करायला सक्षम बनतो त्याचा प्रवास सुसह्य होतो.यासाठी संयमाची साथ घेण्याची सवय हवी.
माणूस येताना एकटा येतो तसा जातानाही एकटाच जातो.हे जीवनाचे मर्म ज्याला कळले, तो ऐहिक सुखाच्या मागे धाव धाव करत नाही.ऐहिक सुखाची हाव करणाराच मोहापायी स्वार्थ भावनेने आचरण करताना कुकर्मे करतो, दुस-यावर अन्याय करतो.माणसांशी माणूस म्हणून वागणे तो विसरतो. जीवन प्रवासाच्या अखेरीस त्याला हे उमगते पण फार उशीर झालेला असतो.मग या जन्माचे याची देही यातना भोगत, जीवनाची अखेर होते.
खरं म्हणजे जीवन फार सुंदर आहे.निसर्गावर प्रेम करणे हा सर्वात आनंददायी अनुभव आहे.हे माझे ते माझे करण्यापेक्षा आयुष्याच्या प्रवासाबरोबर आपल्या मातृभूमीला न्याहाळत, तिच्यावरील सुंदर सृष्टीचा सहवास, तिची सोबत आणि जतन करत जगणे फार आल्हाददायक आहे.
आषाढीची वारीचे उदाहरण फार बोलके आहे .श्रध्दा असतेच पण ध्येयापर्यंत पोचण्याची जिद्द देणारा हा एक जबरदस्त अनुभव आहे.आपल्या संतांनी या वारीच्या निमित्ताने विठ्ठल भक्तीच्या रूपात सद्विविवेकावरची श्रध्दा, मानवी समभाव, चरचरावरील प्रेमभाव दृढ व्हावा म्हणून माणसाने ऊन, पाऊस, संघर्षाचे काटेकुटे कितीही अडथळे आले तरी ध्येयाप्रत पोचण्याची धडपड सोडू नये.त्यासाठी सहभावाने सहज पुढे जाता येते आणि आपले ध्येय गाठता येते.हेच हा वारीचा प्रवास आपल्याला शिकवतो.जे एक आश्चर्य म्हणून परदेशी लोक सुध्दा वारीत सहभागी होतात. *वारी* या विषयावर अभ्यास करतात.संशोधन करतात.
जीवन हे फार सुंदर आहे.माणसाचा जन्म मिळणे फार भाग्याचे आहे.त्या प्रवासाला सार्थ करणे आपल्याच हाती नाही का?
सुशीला हेमचंद्र पिंपरीकर, नाशिक
