सोन्याची माळ फसवणूक प्रकरणी आरोपी सखाराम टीळवे याला जामीन मंजूर
ॲड. विवेक भा. मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद
कुडाळ
चुलत काकीच्या गळ्यातील सोन्याची माळ फसवणूक करून खोटी माळ परत केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सखाराम मारुती टीळवे (रा. कुडाळ) याला आज मे. दिवाणी न्यायाधीश श्री. ग. अ. कुलकर्णी यांच्या न्यायालयाने जामिनावर मुक्तता दिली.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. विवेक भा. मांडकुलकर यांनी प्रभावी युक्तिवाद मांडत जामिनासाठी अर्ज सादर केला होता. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत सखाराम टीळवे याला ५०,०००/- रुपये जातमुचलक्यावर तसेच ठरवलेली अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला. या खटल्यात ॲड. प्रणाली मोरे, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. वृषांग जाधव व ॲड. सुयश गवंडे यांनी सहाय्य केले.
प्रकरणाचे सविस्तर विवरण असे आहे:
२२ जुलै २०२५ रोजी रात्री सखाराम टीळवे याने आपल्या चुलत काकी मंदाकिनी रामचंद्र टीळवे यांना त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाच्या (किंमत अंदाजे ५१,०००/- रुपये) सोन्याच्या माळेचा फोटो काढण्याचे सांगितले. त्यांनी माळ काढून समोर ठेवताच सखारामने फोटो काढला व नंतर फोनवर बोलण्याच्या बहाण्याने बाहेर गेला. तो परत आल्यावर त्याने पिवळसर रंगाची दुसरी माळ देत मूळ माळ दिली नाही. यावर संशय आल्याने मंदाकिनी यांनी माळ कुडाळ येथील सुवर्णकाराकडे नेली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत मंदाकिनी टीळवे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी तपास करून २५ जुलै २०२५ रोजी भारतीय दंड संहिता कलम ३१६(२), ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी आरोपीला भा.न्या.स. ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली. २७ जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली आणि २८ जुलै रोजी रिमांड रिपोर्टसह न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी पाच दिवसांची कस्टडी मागितली, मात्र आरोपीच्या वतीने ॲड. मांडकुलकर यांनी विरोध करत नोटीसीचा उल्लेख केला. युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने पोलीस कोठडी फेटाळली आणि २९ जुलै रोजी सुनावणीत जामीन मंजूर केला.
