अमरावती :
बुधवार दि. 16 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता अमरावती शहरातील संवेदनशील मनाचे कवी श्री सुनील यावलीकर यांच्या रिक्त नदीचा काठ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला रिद्धपूर येथे असलेल्या मराठी विद्यापीठाचे कुलगुरू श्री अविनाश आवलगावकर मराठीतील सुप्रसिद्ध कवियत्री व शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील मराठीच्या माजी प्राध्यापिका प्रभा गणोरकर प्राचार्य डॉ. रमेश अंधारे व शिवाजी कॉलेजचे प्राचार्य श्री अंबादास कुलट उपस्थित राहणार आहेत.
श्री सुनील यावलीकर हे माझे तसे पाहिले तर विद्यार्थी मित्र आहेत. मी त्यांना प्रत्यक्ष शिकविले नाही पण आम्ही जेव्हा प्राध्यापक होतो तेव्हा सुनीलचे व्यक्तिमत्व विद्यार्थी दशेतच विकसित होत होते. हा संवेदनशील मनाचा कवी आहे. कल्पनेत रमणारा नाही.
सभोवताली त्याला जे वास्तव दिसते ते त्याने आपल्या लेखनात कवितेत व चित्रकलेत प्रतिबिंबित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. हा स्वप्नाळू कवी नाही. समाजातील घटना टिपून आजूबाजूच्या प्रसंगाचे चित्रीकरण त्याने आपल्या तिन्ही प्रसार माध्यमातून केले आहे व त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे.
खरं म्हणजे अध्यापनाचा व्यवसाय सांभाळून तीन कलांना वाहून घेणे आणि तेही प्रामाणिकपणे वाहून घेणे म्हणजे अवघडच काम. ट ला ट आणि री ला री अशी त्याची कविता नाही आणि भविष्यातील असणारही नाही. तसा त्याचा पिंड नाही. त्याला प्रतिभेचा तिसरा डोळा गवसला आहे. तसा तो तिसरा डोळा फार कमी लोकांना गवसतो. त्या प्रतिभेच्या तिसऱ्या डोळ्याने त्याने त्याच्या सभोवताल घडणाऱ्या त्याने अनुभवलेल्या शिदोरीवर त्याच्या साहित्याची त्याच्या चित्रकलेची निर्मिती झालेली आहे.
आज काल कवी लोकांना चांगले दिवस आहेत. आमच्या काळात ते नव्हते. आता सोशल मीडिया आहे. वर्तमानपत्र आहेत .वेळोवेळी होणारे साहित्य संमेलने आहेत. किंवा बरेच कवी साहित्यिक एकत्र येतात आणि साहित्य संमेलन घडवून आणतात .त्यामुळे कवीची संख्या प्रचंड वाढली आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे. त्यांची पुस्तके भराभर निघत आहेत. ही आनंदाचीच बाब आहे.
आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू श्री दादासाहेब काळमेघ ह्यांचा कवितासंग्रह ते 63 वर्षाचे असताना प्रसिद्ध झाला होता. त्यांचा सत्कार समारंभ व अभंग दादांचे असा तो समारोह होता. एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून दादासाहेबांना 63 वर्षे वाट पाहावी लागली होती. आता मात्र चित्र वेगळे आहे. परवा मी माझे विद्यार्थी मित्र श्री किशोर फुले यांच्या मुलीच्या कविता संग्रहाच्या प्रकाश समारोहाला गेलो होतो. ती मुलगी दहावीला आहे. किती भाग्यवान आहे .दहाव्या वर्गात असताना कवितासंग्रहाचे प्रकाशन. त्यामुळेच आजच्या काळ कवी लोकांसाठी सुकाळ आहे असे विधान मी केलेले आहे.
त्याच्या कादंबरीचे कवितासंग्रहाचे चित्रांचे शीर्षक पाहिले की त्याच्या संवेदनशीलतेची जाण आपल्याला येते. विरक्त नदीचा काठ या त्याच्या प्रकाशित होणाऱ्या कवितासंग्रहाच्या शीर्षकावरूनच मनामध्ये उत्सुकता निर्माण होते आणि त्या उत्सुकतेला न्याय देण्याचे काम सुनीलने नेहमीच आपल्या कवितेतून व इतर माध्यमातून सातत्याने केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्याने आपल्या चित्रकलेचे प्रदर्शन भरविले आहे. ही त्याची जमेची बाजू आहे. त्याला मिळालेल्या पुरस्काराची यादीही मोठी आहे. वेगवेगळ्या सामाजिक व साहित्यिक संस्था अशा संवेदनशील कवीची दखल घेतच असतो. महाराष्ट्राने त्याला वेळोवेळी गौरविले आहे. आणि आता तर तो तरुण आहे. त्याला अजून भविष्यातही चांगले गौरविले जाणारही आहे.
सुनीलची अधूनमधून श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सकाळी फिरायला जाताना भेट होते. तो आणि आमचे दुसरे मित्र युनिक अकादमीचे संचालक प्रा. अमोल पाटील सकाळी अमरावती विद्यापीठात फिरावयास येतात. मी पण येतो. आमचा हलो हाय होतो.
आज सुनीलच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे आणि ज्याने प्रकाशकही चांगला निवडला आहे. अमरावतीचे ध्यानपथ प्रकाशन हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशन व्यवसायामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आहे. हजारच्या जवळपास पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. देखणे मुखपृष्ठ देखणी छपाई आकर्षक मांडणी आणि सर्वात महत्त्वाचं आशयघन कविता ही या कवितासंग्रहाची वैशिष्ट्ये आहेत.
सुनील नुसता लेखक कवी व चित्रकारच नाही तो एक चांगला वक्ताही आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये तो सातत्याने सहभागी होत असतो. मला काय त्याचे असे त्याचे वागणे नाही. समाजात घडणाऱ्या सर्व सामाजिक चळवळीमध्ये तो सक्रिय आहे. त्याचे व्यक्तिमत्त्व देखणे आहे. हे देखणेपण त्याच्या लेखनात कवितेत व चित्रकलेत नकळत चितारले आहे. खरं म्हणजे तीन कलांना समरस होणे आणि त्या तिन्ही कलांना लोकांनी सफलतेची पावती मिळविणे ही किमया त्याने साधली आहे. आमच्या अमरावतीचा नव्हे तर विदर्भातला एक दमदार कवी दमदार लेखक दमदार चित्रकार दमदार वक्ता असाच त्याचा गौरव करावा लागेल. त्याच्या ह्या रिक्त नदीचा काठ या कविता संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त त्याच्या लेखन प्रवासाला हार्दिक शुभेच्छा.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस.
अमरावती कॅम्प
9890967003
