*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*योग आरोग्याचा कल्पतरू*
मानवाचं जीवन धावपळीच झाले आहे. त्यामुळे आरोग्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसते. प्रत्येक जण कोणत्या कोणत्यातरी आजाराने ग्रासलेला आहे. यावर उपाय काय? असा प्रश्न सर्वांना पडतो. यावर एक उत्तम पर्याय म्हणजे योगा करणे. शारीरिक व मानसिक आरोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. रोग निवारणासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस पहिल्यांदा 21 जून ला साजरा करण्यात आला..
योग हा फक्त व्यायामच नव्हे तर एक वैदिक दर्शन आहे. भारताच्या प्रमुख सहा वैदिक दर्शना पैकी हा एक आहे.
शास्त्रज्ञांनी ” योग ” हा लाभदायक आहे हे सिद्ध केले आहे. पण एक गोष्ट मात्र खरी की योगासने ही खरोखरचं खूपच लाभदायक असतात
योगक्रिया केल्यास फक्त शरीरालाच नव्हे तर मेंदूसाठीही अतिशय लाभदायक आहेत.योगामुळे शरीर अत्यंत लवचिक होते मन टवटवीत व आनंदी राहते. शरीरात उत्साह भरून राहतो. दिवसभर कितीही काम केले तरी शरीर थकत नाही.मन प्रसन्न राहते पण त्यासाठी योगा मात्र नियमित करायला हवा..
योगक्रियेत आसन प्राणायाम व ध्यानाचा समावेश होतो. आसनामुळे शरीरातले जखडलेले स्नायू मोकळे होतात. हालचालीत लयबद्धता येते. वजन नियंत्रित राहते. माणूस चपळ बनतो. प्राणायाम व ध्यानामुळे आजार लवकर बरा होतो. मन एकाग्र करता येते. श्वासावर नियंत्रण राहते. शांत चित्ताने संकटातून योग्य मार्ग काढून त्यातून सहिसलामत बाहेर पडतो.विचार करण्याची क्षमता/ वैचारिक पातळी प्रगल्भ होते. सकारात्मक विचारांचा पगडा मनावर बसतो मनातले नकारात्मक विचार बाजूस सारण्यास आपण यशस्वी होतो. शरीरासोबतच मेंदू व मन प्रफुल्लित राहते व चेह-यावर एक वेगळ्याच प्रकारचे तेज निर्माण होते
माणसाला त्याच्या सर्वोच्च अवस्थे पर्यंत पोचवण्याचे हे माध्यम आहे. जेणेकरून माणसाचे शरीर व मन तयार होईल. शरीरालाही निरोगी सुंदर व शक्तिशाली बनवते.
योगसाधना व योगासने यांच्या नित्याचरणाने शरीर निकोप होत जाते, तसेच मनही शुध्दतेच्या मार्गाला लागते. धारणा-ध्यान त्याला सदाचाराकडे झुकवते. आसन व प्राणायाम यांच्या नित्यपरिपाठाने मनुष्याच्या चित्तवृत्तीत बदल होतो. तो अंतर्मुख होऊन त्याचे विवेक विचार जागृत होतात.
जेंव्हा एखादी व्यक्ती शारीरिक दृष्ट्या निरोगी, मनाने शांत आणि भावनिक दृष्ट्या स्थिर असेल तरच तिला संपूर्ण निरोगी म्हणता येईल..योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीसोबत सक्षम मन आणि भावनिक क्षमता प्राप्त होते
योगामुळे सर्व स्तरावरील आरोग्य वाढते. आरोग्य म्हणजे आपल्या जीवनातील बदल शांत मनाने हाताळण्याची क्षमता प्राप्त करणे. योग आपल्याला शरीर, श्वास आणि मन या विविध स्तरावर निरोगी ठेवतो. योगासनांमुळे सर्व शरीराला व्यायाम मिळतो, प्राणायाममुळे श्वसनाचे व्यायाम होऊन फुफ्फुसांची क्षमता वाढते. निव्वळ श्वासावर लक्ष ठेवणे, योगासने आणि ध्यान केल्याने मनातील भावनांचा प्रासंगिक चढ-उतार नाहीसा होऊन मन शांत बनते.
शांत-निर्मळ मनामुळे त्याची क्षमता
वाढून चांगली निर्णयक्षमता आणि दीर्घ काळासाठी एकाग्रता प्राप्त होते.
जेंव्हा अपेक्षेप्रमाणे एखादी गोष्ट घडत नाही तेव्हा स्वाभाविकच आपल्याला राग येतो आणि हा राग किती काळ टिकतो ? ..तर तो राग पाण्यावर मारलेली रेषा जेवढा वेळ टिकते तेवढा वेळच असायला हवा. काही जण आदल्या दिवसाचा , काहीजण गेल्या महिन्यातला तर काहीजण अनेक वर्षापूर्वीचा राग मनात धरून ठेवतात. हे सर्व मनाला सहन करावे लागते.आणि यातूनच सहिसलामत बाहेर पडायला ध्यान मदत करते. प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि योग हेच इलाज आहेत.
ह्या सर्वांसाठी योग्य ” योग प्रशिक्षकाचे ” मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शनावर यासाठी भर देण्यात येतो की ब-याच वेळा अतिउत्साहात चुकीचा व जास्त प्रमाणात आसन प्राणायाम केले तर आपलेच नुकसान होऊ शकते. योग हा आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे.
योगाचे महत्त्व त्याच्या पूर्णत्वात आहे. योग हा केवळ शारीरिक किंवा भौतिक उन्नतीचे साधन नाही तर त्यात व्यक्ती समाज व निसर्ग हे ही समाविष्ट आहेत.
योगामुळे आपल्याला शरीर व मेंदूचा कसा वापर करावा याची जाणीव होते व्हायला लागते. त्याचा परिणाम आपल्या शारीरीक व मानसिक आरोग्यासाठी चांगलाच होतो. त्यासाठी योगासने जर रोज केली तर ती अधिकचं लाभकारक ठरतात. परंतु हे ही लक्षात ठेवायला हवे की
” हे अंतिम ध्येय नाही तर लांब पल्ल्याच्या रस्त्यावरील एक मुक्काम आहे व तो जास्त लाभदायक आहे “..
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
