You are currently viewing माणसा माणसा कधी होशील तू माणूस

माणसा माणसा कधी होशील तू माणूस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*माणसा माणसा कधी होशील तू माणूस*

 

चौर्‍यांशी लक्ष योनीतून फिरल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो असे म्हणतात. असा हा दुर्मिळ जन्म मिळाल्यानंतर मोठे होत असताना प्रथम घरातून,नंतर शाळेतून त्याच्यावर सुसंस्कार घडत असतात.मॉरल सायन्स, नागरिक शास्त्र हे विषय माणसाला कसे वागावे, कसे जगावे याचे धडे देत असतात. मात्र डोळे उघडून पाहिले असता आज प्रत्येक ठिकाणी खल प्रवृत्ती वृद्धिंगत झाल्यासारखे दिसते.

 

दुष्टांचा संहार करण्यासाठी,अधर्माचा विनाश करण्यासाठी त्रेतायुगात रामावतार आणि द्वापार युगात कृष्णावतार झाले. वाईट मात्र याच गोष्टीचे वाटते की तरीसुद्धा या कलियुगात दुष्ट बुद्धी, स्वार्थ, मत्सर, द्वेष या गोष्टी काही थांबल्या नाहीत. शिर्डीचे श्री साईबाबा,अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ,शेगावीचे संत गजानन महाराज आदि संत पुरुषांच्या अवतारांनीही कलियुगातील अधर्म थांबला नाही. माणसातील मानवता लुप्त झाली.

 

सकाळी चहा पिताना वर्तमानपत्र उघडावे, तर मन खिन्न करणाऱ्या बातम्या प्रथमदर्शनी नजरेस पडतात.

 

*राजकारण*- येथे तर सतत पक्षापक्षांतील मतभेद आणि भांडणेच आढळतात.विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाचे कायम पाय ओढणार, त्यांची सत्ता हाणून पाडण्याचा प्रयत्न करणार. दोन पक्ष

घटकेत भांडणार तर तेच दोन पक्ष युतीही करणार. काय ही मनोवृत्ती? यांच्या खुर्चीच्या भांडणापायी सामान्य जनतेचे काय हाल होत आहेत याकडे लक्ष आहे का कुणाचे? अशी ही सो कॉल्ड लोकशाही!

 

कशासाठी आहे हा दहशतवाद? अहो,

*वसुधैव कुटुंबकम्* ही आपली संस्कृती.या सूडबुद्धीमुळे किती निरपराध माणसे मृत्यूमुखी पडतात,किती संसार उध्वस्त होतात.दहशतवादाला उत्तर म्हणून उरी मिशन झाले,आता मिशन सिंदूर आले.करणार काय?

समोरून हल्ले झाले तर ते थोपविले तर पाहिजेतच! माणसा तुला सद्बुध्धी लाभो आणि भविष्यात हा दहशतवाद नष्ट होवो रे बाबा!

 

माणसातील विकृती तरी किती वाढावी? रोजच्या रोज खुनाच्या,बलात्काराच्या बातम्या

वाचनात येतात,ऐकण्यात येतात. समाजाचे रक्षक म्हणविणारेच तरुणींवर बलात्कार करू लागले तर सामान्यांनी आधार घ्यायचा कुणाचा?

एकाच मुलीवर दोन तरुण प्रेम करत असले, तर एक प्रेमवीर दुसऱ्याचा खून करतो. प्रेमभंग झाला म्हणून तो तरुण तरुणीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून तिला विद्रूप करतो. हे कसले हो प्रेम? त्या मुलीचा काही विचार? खरे प्रेम तर त्यागात असते ना?

 

हुंडाबळी हा आणखी एक अमानवी प्रकार! कायद्याने हुंडा घेणे गुन्हा असला तरी अप्रत्यक्षरित्या मुलीच्या बापाकडे वर पक्षाच्या मागण्या थांबलेल्या दिसत नाहीत. मागण्या पूर्ण करता करता बाप थकला तर पुढे काय? मुलीचा हुंडाबळी ठरलेला. आजही ही प्रकरणे पूर्णतया थांबलेली नाहीतच.

 

स्वतःला माणूस म्हणून घेणाऱ्या या प्राण्याने निसर्गालाही सोडले नाही हो! पोटाची खळगी भरण्यासाठी गावाकडून शहरांकडे माणसांचे लोंढे येऊ लागल्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न उभा राहिला हे खरे, परंतु म्हणून माणसाने किती जंगलतोड करावी? निसर्गाचा किती ऱ्हास करावा? बिल्डर लॉबीने पैशाच्या हव्यासापोटी किती टॉवर उभारावे? निसर्गाची, पर्यावरणाची हानी करून माणसाने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे हे या मूर्खांना कसे समजत नाही? स्वार्थाने ही सर्व माणसे अंध झाली आहेत का? असा प्रश्न माझ्या मनाला सतत भेडसावत राहतो.

 

शेतकऱ्यांच्या मालाला भाव का मिळत नाही? मधल्यामध्ये हे दलाल लोक माल हस्तगत करून स्वतःचे खिसे भरत आहेत. कष्टकऱ्यांनी काय करावे? कसे जगावे?

 

क्रीडा क्षेत्रातही मॅच फिक्सिंग होत असल्याचे आपण ऐकतोच.

 

थोडक्यात काय नीतिमुल्ये हरवली आहेत. परोपकार, सचोटी, सत्कर्म वगैरे पुस्तका तील शब्द पुस्तकातच राहिले आहेत बहुदा. माणसांचा पैसा या एका शब्दाखेरीज कशाशीच संबंध राहिला नाही. या पैशाच्या मोहा पायी पोटचा मुलगा आई बापाला रस्त्यावर आणण्यास मागेपुढे पाहत नाही. भाऊ भावाला विचारत नाही, जमीन जुमल्यांच्या वाटण्यांवरून कितीतरी कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. नात्यात प्रेमाचे बंध उरले नाहीत. बघावे तिकडे मी आणि माझा पैसा! अरे माणसा, स्वतःला माणूस म्हणव तोस ना? मग वागना रे माणसासारखा!

 

समर्थ श्री रामदासांनी माणसाने माणसासारखे जगण्यासाठी दासबोध हा मोठा थोरला ग्रंथ लिहिला. अरे त्यातील किमान उत्तम पुरुषाची लक्षणे तरी वाच. ते आपल्याला माणुसकीचा मार्ग दाखवतात. सांगतात,

वाट पुसल्याविण जाऊ नये

फळ ओळखल्याविण खाऊ नये

पडली वस्तू घेऊ नये

एकाएकी

 

अति वाद करू नये

पोटी कपट धरू नये

विचारेविण बोलू नये

मर्यादेविण हलू नये

 

बोलीला बोल विसरू नये

केल्याविना निखंदू नये

सुखा अंग देऊ नये

प्रयत्न पुरुषे सांडू नये

 

बहुत चिंता करू नये

निसुगपणे राहू नये

परस्त्रीते पाहू नये

पापबुद्धी

 

उन्मत्त द्रव्य घेऊ नये

तोंडी शिवी असू नये

देखिली वस्तू चोरू नये

बहुत कृपण होऊ नये

 

सत्वगुण सांडू नये

वैऱ्यासही दंडू नये

शरण आलिया

 

यातील एकेक गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करशील तर अरे माणसा तू नक्कीच माणूस होशील.

शेवटी एवढेच सांगेन की अंगी सत्वगुणाची जोपासना करण्यासाठी

हरी कथा सांडू नये

निरूपण तोडू नये.

 

*अरुणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

प्रतिक्रिया व्यक्त करा