संकटावर मात करून मुले झालीत कलेक्टर
एक वेळ अशी होती की बिहार आणि उत्तर प्रदेश मधीलच मुले मोठ्या संख्येने आयएएस होत होती. पण आता हे चित्र पालटले आहे. यावर्षीच्या निकालामध्ये महाराष्ट्रातील 93 विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा उत्तीर्ण करून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. मराठी पाऊल पडते पुढे असेच म्हणावे लागेल.
ही जी मुले कलेक्टर झालीत त्यांचा आम्ही परवाला पुण्याला सत्कार घेतला. संपूर्ण महाराष्ट्रातून 17 मुले आली होती. त्यांच्या मनोगत ऐकून एकच गोष्ट लक्षात आली की सर्वांनी शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आहे. बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातले होते. काही काही मुलांना तर वडीलही नव्हते. पण या सर्वावर मात करून ते कलेक्टर झाले होते.
अमरावतीला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त म्हणजे 6 जूनला सकाळी 11 वाजता आम्ही शेगाव नाका चौकातील अभियंता भवन मध्ये अशाच विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन आयएएस झालेल्या मुलांचा सत्कार ठेवला आहे. या सत्काराला अमरावतीतील सर्व सनदी अधिकाऱ्यांनी येण्यास मान्यता दिली आहे. ही आठ मुले म्हणजे आपल्यासमोर आदर्श ठरावीत आणि या मुलांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हे प्रयोजन आहे आणि त्यासाठी आम्ही दिवस निवडला तो शिवराज्यभिषेक दिनाचा.
हा कार्यक्रम आगळा वेगळा आहे .किमान चार तास चालणारा आहे. शिवराज्याभिषेक संपूर्ण जगात साजरा केला जातो. पण आमचा शिवराज्याभिषेक आम्ही आगळा वेगळा घेतला आहे.
रजत श्रीराम पत्रे
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील श्रीराम पत्रे यांचा हा मुलगा. श्रीराम पत्रे हे स्वतः जाणकार व सुजाण नागरिक आहेत आणि त्यांनी रजत लहान असतानाच ठरवले होते ही आपल्याला रजतला कलेक्टर करायचे आहे. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे त्यासाठी आपला मुलगा कार्याला लागला पाहिजे. खरं म्हणजे धामणगाव हे लहानसे गाव. रजत दहावी झाल्यानंतर त्याने पुणे गाठले आणि चक्क कला शाखा निवडली .कला शाखेतून पदवी घेऊन तो उच्च शिक्षणासाठी दिल्लीला गेला. आयएएसची प्रामाणिकपणे तयारी केली आणि त्याला 300 वी रँक मिळाली. खरं म्हणजे यापूर्वीच तो कलेक्टर झाला असता .पण त्याने अर्जावर दाढी असलेला फोटो लावला होता. प्रत्यक्षात तो मुलाखतीला दाढी करून गेला .त्यामुळे तो त्या परीक्षेत पास होऊ शकला नाही. त्याच्या विजयानिमित्त धामणगावला पाच तास मिरवणूक निघाली. सर्वांनी या मुलाचे कौतुक केले.
आदिबा अमन
ही मुलगी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. मुस्लिम समाजातील मुलगी आयएएस होणे म्हणजे फारच मोठी गोष्ट झाली. आणि त्यातही तिला 142 वी रँक मिळाली आहे. यवतमाळच्या कळंब चौकातील दाटीवाटीच्या घरांमध्ये तिचे इवलेसे घर आहे. वडील ऑटो चालक आहेत. परवा मी तिला निमंत्रण द्यायला यवतमाळला गेलो. ती म्हणाली सर मी लहानपणापासून वेगवेगळ्या प्रेरणादायी कार्यक्रमाला जात होती.त्यातून मला खरं आयएएस होण्याची इच्छा निर्माण झाली व त्या दृष्टिकोनातून मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. तिला आयएएस होण्यासाठी यवतमाळची सेवा नावाची संस्था उभी झाली. पुण्याच्या आझम कॅम्पसने तिला पाठबळ दिले. तर दिल्लीच्या जामिया विद्यापीठाने तिला आय ए एस. चे प्रशिक्षण दिले. एका ऑटो रिक्षा चालकाची मुलगी जर कलेक्टर होऊ शकते तर इतरांची का नाही आणि म्हणूनच मराठी पाऊल पडते पुढे या न्यायाने आपण कामाला लागले पाहिजे
डॉ. जयकुमार आडे
प्रत्येकाच्या मनात डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न असते .जयकुमार यांचे पण तेच स्वप्न होते. एमबीबीएस झाले .नोकरीला लागले आणि नोकरी मधले जे अनुभव आले त्यावरून त्यांनी ठरवले की आपण प्रशासनात जायचं. एक डॉक्टर म्हणून आपण एक दवाखाना पाहणार .पण प्रशासनात गेलो तर पूर्ण जिल्हा पाहणार .पूर्ण विभागात काम करणार. पुढे चालून पूर्ण राज्यात काम करणार .त्यासाठी त्यांनी आयएएस निवडले. वडील अध्यापक असल्यामुळे घरचे वातावरण शैक्षणिक विकासाला पोषक होते. योग्य ते खतपाणी त्यांना मिळाले व त्यातून ते आयएएस झाले.
नम्रता ठाकरे
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील हातुर्णा हे लहानसे गाव. वरुड वरून 18 ते 20 किलोमीटरवर असणारे. या गावची एक मुलगी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायला लागली. तिचे नाव नम्रता ठाकरे. तीन प्रयत्न झाले .आई-वडील म्हणाले .आता बस झाले .नम्रता म्हणाली. बाबा एक संधी द्या .बाबा म्हणाले .तू आता एमपीएससीची तयारी कर. तिने एमपीएससीचा फॉर्म भरला .सोबत आय ए एस.चा पण भरला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसायचे होते. तयारी झालीआणि नेमकी परीक्षा दोन-तीन महिने पुढे ढकलल्या गेली. एक महिन्यानंतर आय ए एस.ची परीक्षा होती .फॉर्म भरलेला होता अभ्यास झालेला होता .एका महिन्यात तिने पूर्ण सिंहावलोकंन केले .परीक्षा दिली आणि आमची ही लेक कलेक्टर झाली .गेली एमपीएससीची परीक्षा द्यायला आणि पास झाली यूपीएससी. आम्ही जेव्हा पत्रकार श्री गिरीधर देशमुखसह तिला निमंत्रण दिले तेव्हा पूर्ण परिवाराला आनंद झाला होता. तिच्या कुटुंबातील लोक आम्हाला घ्यायला रस्त्यावर आले होते. आज आनंदी आनंद झाला असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता
मोहिनी खंडारे
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हा महत्त्वाचा तालुका त्यातही श्री वसंतराव नाईक व श्री सुधाकरराव नाईक यांच्यामुळे चर्चेत असलेला तालुका. याच तालुक्यातील मोहिनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएस ह्या परीक्षेची तयारी करीत होती. त्यापूर्वीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाली. उपशिक्षणाधिकारी म्हणून बुलढाणा येथे पोस्टिंग झाले. खरं तर चांगली नोकरी मिळाली होती. पण तिला कलेक्टर हे पद खुणावत होते .तिने परीक्षा दिली .खर म्हणजे उपशिक्षणाधिकारी हा भार सांभाळून घर सांभाळून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणे किती कठीण आहे ते तिलाच माहिती. पण तिने जिद्दीने सातत्याने परिश्रम करून आयएएस गाठल. तिच्या वडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी गावभर पेढे वाटायचे ठरवले. तो आनंदाचा प्रसंग होता. पण पेढे वाटत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. पण मला खात्री आहे मोहिनी या समाजाचे भले करून आपल्या वडिलांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करणार आहे. परवा मी तिला पुण्याला भेटलो. ती म्हणाली सर मी येते. काळजी करू नका. तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे .हा कार्यक्रम निश्चितच नवीन पिढीला दिशा देणारा आहे.
डॉ. पंकज पटले
आपल्या विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया हे जिल्हे म्हणजे मागासलेले जिल्हे. त्यातही तिरोडा हा आडवळणीचा तालुका. अडाणीचा प्रकल्प तिथे सुरू आहे. गोंदिया जिल्ह्याला लागूनच मध्य प्रदेश आहे. नक्षलग्रस्त कार्यवाहीमुळे हा परिसर हिटलिस्टवर आहे. या तिरोड्याचा मुलगा डॉक्टर झाला. पण मन रमत नव्हते. समाजासाठी भरपूर काही करायची इच्छा होती. आणि म्हणून तन मन धनाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयएएसचा अभ्यास केला आणि कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
डॉ.अभय देशमुख
गेल्या काही वर्षांमध्ये डॉक्टर इंजिनियर हे आयएएस कडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. कारणही तसेच आहे. कारण प्रशासनामध्ये जी निर्णय क्षमता घेण्याची ताकद आहे समाजभिमुख होण्यासाठी जो वाव आहे तो अनेक तरुणांना आकर्षित करतो .तसाच डॉक्टर अभय देशमुख यांनाही तो आकर्षित करून गेला. डॉक्टर होऊन भरपूर पैसे मिळवण्यापेक्षा कलेक्टर होऊन माझ्या मागासलेल्या यवतमाळ जिल्हया सारख्या जिल्ह्यात गोरगरिबांची सेवा करता आली तर किती चांगले होईल त्यासाठी त्यांनी सातत्याने अभ्यास केला आणि आयएएस या परीक्षेमध्ये सफलता प्राप्त केली
डॉ.अश्विनी धामणकर
विदर्भातील वाशिम जिल्हयात मंगरूळपीर हा तालुका. या तालुक्यामध्ये एस टी स्टँडच्या मागे राहणारी ही मुलगी. मी कसातरी अश्विनीचा नंबर मिळविला. आणि माझ्या सहकारी मित्रांबरोबर मंगरूळपीर येथे पोहोचलो. आमचे स्वागत करायला अश्विनीच बाहेर आली. तिच्या घरात शिरताच बैठकीच्या खोलीत फुलांचा बुके यांचा ढिगारा दिसला .निकाल लागून दोन-तीन दिवसच झाले होते .पण अश्विनी सांगत होती. सर सतत येणारे लोक सुरू आहेत. स्वागत करायला पूर्ण जिल्ह्यातून लोक येत आहेत. मी तिला म्हणालो अगं कितीतरी दिवसानंतर वाशिम मधला मुलगा तुझ्या रूपाने कलेक्टर झालेला आहे. अश्विनी डॉक्टर तर झाली .पण तिचा पिंड सामाजिक बांधिलकीचा. वडील शैक्षणिक क्षेत्रात. त्यामुळे वडिलांनीही तिला प्रोत्साहन दिले. अश्विनीने निमंत्रण स्वीकारले. मला जितक्या गावाला जाता येणार तितक्या गावाला मी जाणार आहे. मुलांना आयएएस बाबत जागे करणार आहे असे ती म्हणाली.
ह्या सगळ्या नवीन आय ए एस झालेल्या मुलांनी शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 11 वाजता अमरावतीच्या अभियंता भवनामध्ये होणाऱ्या सत्कारासाठी व स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी येण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या जोडीला अमरावतीच्या सर्वच आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंगल श्री रामदास पोकळे जिल्हाधिकारी श्री आशिष शेरेकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र पोलीस आयुक्त श्री अरविंद चावरिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन कलंत्रे तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी श्री अनिल औतकर यांचा समावेश आहे.
एका स्टेजवर एवढे आयएएस अधिकारी एकत्र येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी आम्ही हरियाणाची सेना अग्रवाल ही संपूर्ण भारतातून जेव्हा पहिली आली तेव्हा तिचा अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमाला 17 आय ए एस आयपीएस अधिकारी स्टेजवर होते. मला वाटते तो एक विक्रम होता. आमच्या महाराष्ट्रातील ही मुले मोठ्या संख्येने कलेक्टर झाली पाहिजे त्यासाठी आमचा हा अट्टाहास आहे. ज्यांना ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला उपस्थित राहून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण केली पाहिजे एवढेच….!
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
