देवगड :
कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेपूर्वी अपूर्णावस्थेत असलेली कामे पुर्ण करावीत अशा सुचना उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सर्व विभागप्रमुखांना कुणकेश्वर यात्रोत्सवानिमित्त आयोजित नियोजन आढावा बैठकीत दिल्या.
श्रीदेव कुणकेश्वर मंदीर कार्यालयात बुधवारी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सव नियोजन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत यात्रोत्सवासाठी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील भाविक मोठ्या प्रमाणात येतात यामुळे उत्सवाचा वेळी भाविकांच्या व्यवस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, कायदा व सुव्यवस्थेबाबत तसेच यात्रा नियोजनाच्या अनुषंगाने विषयांचा आढावा घेण्यात आला.यामध्ये आवश्यक असणारी कामे तसेच अपुर्णावस्थेत असलेली कामे यात्रोत्सवापुर्वी पुर्ण करावीत अशा स्पष्ट सुचना प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या.
या बैठकीला नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर, सरपंच महेश ताम्हणकर, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव, पोलिस निरिक्षक अरूण देवकर,न.पं.मुख्याधिकारी सुरज कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश पाटील, देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष गणेश वाळके, खजिनदार उदय पेडणेकर, सदस्य संजय वाळके, दिपक घाडी, शैलेश बोंडाळे व ग्रामसेवक गुणवंत पाटील तसेच विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
यावेळी यात्रोत्सवापुर्वी करावयाची कामे यामध्ये कुणकेश्वर मंदीर ते तारामुंबरी हा खड्डेमय झालेला रस्ता दुरूस्त करण्यात यावा. वाहनतळाच्या कामाची डागडुजी करण्यात यावी, कुणकेश्वर मुख्यरस्त्यावर साईडपट्टी करीता रंगपट्टी मारणे, फोन सुविधा,इंटरनेट सुविधा सुस्थितीत ठेवणे, एसटी बसचे वेळापत्रक प्रत्येक गावोगावी पुरविणे, बीएस्एन्एल् मार्फत कुणकेश्वर मंदीरामागे उभारण्यात आलेल्या टॉवरची दुरूस्ती करणे, अन्नभेसळ विभागामार्फत तपासणी करता योग्य ती कार्यवाही करणे, रस्त्याचा दुतर्फा झाडी तोडणे, जिल्हा पोलिस कक्षामार्फत यात्रा कालावधीत करण्यात येणाऱ्या बंदोबस्ताची वेळ निश्चित करून देण्यात यावी, अग्निशामक बंब उपलब्ध करून देणे, कचरा संकलनसाठी घंटागाडी उपलब्ध करून देणे,तात्पुरते शौचालय ३० सीट उपलब्ध करून देणे, बीएसएनएल, जीओ व एअरटेल टॉवरची क्षमता वाढविणे, दुरूस्ती करणे.कुणकेश्वर पर्यटन संकूलाच्या खालील बाजूस असणाऱ्या मोकळ्या जागी सपाटीकरण करून जादा पार्कींग ग्राऊंड तयार करणे आदी कामे यात्रोत्सवापुर्वी पुर्ण करावीत अशा सुचना प्रांताधिकारी यांनी यावेळी केल्या.
तसेच अपुर्ण असलेल्या कामांमध्ये वाहनतळाचे अर्धवट काम यात्रोत्सवापुर्वी पुर्ण करावे, कुणकेश्वरकडे येणारे रस्ते यामध्ये वाळकेवाडी ते कुणकेश्वर अंतर्गत रस्ता, लिंगडाळ तिठा सावरघाटी मार्गे कुणकेश्वर रस्ता दुतर्फा झाडी तोडणे,मशवी नारींग्रे मार्गे कुणकेश्वर नवीन रस्ता डांबरीकरण करणे, दहिबांव जांभुळवाडी ते कुणकेश्वर तळे रस्ता डांबरीकरण करणे या सर्व रस्त्यांचे यात्रोत्सवापूर्वी रूंदीकरण व डांबरीकरण करणे,कुणकेश्वर ते कातवण मिठबांव मार्गावर भुमिगत विद्युतीकरण कामकाज सुरू असून रस्त्याचे साईडपट्टी खचल्याने दुर्घटना होण्याची शक्यता आहे यामुळे माती दगड टाकून मजबूत करणे, सुरूचे बन खड्डेमय असलेला रस्ता डांबरीकरण करणे, चढावादरम्यान कायमस्वरूपी बॅरीकेटींग करणे ही कामे पुर्ण करावीत अशी मागणी करण्यात आली.
बैठकीत यात्रोत्सवामध्ये करण्यात येणाऱ्या अग्निशामक दल व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले यामध्ये पावणाई मंदीराकडे मालवण न.पं.चे अग्निशामक वाहन, ग्रामसेवा संघ इमारतीकडे देवगड न.पं.चे अग्निशामक वाहन व देवगड बस डेपोकडे कणकवली न.पं.अग्निशामक वाहन ठेवण्यात येणार आहे.पोलिस दलाची व्यवस्था मुख्यालय प्राथमिक शाळा कुणकेश्वर येथे करण्यात येणार असून इतर पोलिस दलाची व्यवस्था एमटीडीसीजवळ, पावणाई देवी मंदीराकडे, कुणकेश्वर मंदीर परिसर व सडा परिसर येथे करण्यात येणार आहे.
आरोग्य यंत्रणा व्यवस्था मंदीर परिसर व प्राथमिक शाळा नं.१ येथे व एमईसीबी यंत्रणा व्यवस्था ग्रा.पं.जवळ करण्यात येणार आहे.एसटी महामंडळ व्यवस्था कुणकेश्वर सडा बोंडाळे यांच्या जागेमध्ये व एमटीडीसीकडे तसेच रिक्षाचालक पार्कींग व्यवस्था पावणाई देवी मंदीराकडे, कुणकेश्वर सडा, कुणकेश्वर देवगड रोड बोंडाळे यांच्या खाजगी जागेत व आपत्ती निवारण कक्षाचे नियोजन ग्रा.पं.परिसर व मंदीर परिसरात करण्यात येणार आहे. या नियोजनाची कार्यवाही सर्व विभागांनी करावी अशा सुचना प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केल्या.
