You are currently viewing जीवनात अन्न सुरक्षित असणे महत्वाचे..

जीवनात अन्न सुरक्षित असणे महत्वाचे..

अन्न सुरक्षा अधिकारी संतोष शिरोशिया यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्गनगरी

आपल्या रोजच्या दैनंदिन जिवनात भेसळयुक्त कितीतरी पदार्थ आपण वापरतो. रोजच्या जिवनातील सर्व प्रकारच्या भाज्या ह्या रासायनिक खतावर वाढवल्या जातात. तांदूळ, गहू इतर सर्व कडधान्य यांच्यावरही खताचा भरपूर वापर होतो. चायनीज पदार्थ व त्यामध्ये वापरले जाणारे अनेक पदार्थ शरीरास हानिकारक आहेत. तरीही लोक चवीसाठी हे पदार्थ खातात. अन्न सुरक्षित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन अन्न सुरक्षा अधिकारी संतोष शिरोशिया यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कायदा २००६, नियम व नियमने २०११ या विषयावर ओरोस येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सहाय्यक लोक अभिरक्षक श्वेता तेंडोलकर, मुख्याध्यापक अशोक रायबान व सहकारी शिक्षक उदय सावंत हे उपस्थित होते.
श्री. शिरोशिया म्हणाले, बाहेर टपरीवरील वडापाव, तळलेले पदार्थ, व इतर बंद पॅकेट मध्ये मिळणारे पदार्थ हेदेखील भेसळयुक्त असतात. त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. खाद्य पदार्थांच्या पॅकेटवर अन्न व औषध प्रशासनाची विविध चिन्हे असतात. बाजारामध्ये अन्न पदार्थ विक्रीसाठी व अधिक नफा मिळवण्यासाठी भेसळयुक्त किंवा कमी दर्जा असलेले विक्रीस आणले जातात. म्हणून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी FSSI, ISI यांसारख्या संस्था राष्ट्रीय स्तरावर स्थापन करण्यात आल्या आहेत. यासाठी अन्न सुरक्षा कायदा २००६, नियम व नियमने २०११ बाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात करताना सहाय्यक लोक अभिरक्षक श्वेता तेंडोलकर म्हणाल्या, पूर्वी अन्न भेसळयुक्त नसल्यानेच माणसे अनेक वर्ष जगत होती. पण, सध्याच्या परिस्थितीनुसार अन्नपदार्थ भेसळयुक्त झाल्याने माणसाला अनेक आजार उद्भवत आहेत. या कार्यक्रमासोबत मुलांचे अधिकार विषयी जनजागृती व साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या विषयावर श्रीमती तेंडोलकर यांनी कायदेविषयक माहिती व्यक्त केली. सर्व मुले भारताचे पुढचे भविष्य आहेत. अशी मुले ही निर्भीड, कर्तृत्ववान पाहिजेत यासाठी या शालेय वयातच आपल्याविषयी कायद्यांची माहिती पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मुलांच्या विविध कायद्यांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा