कोरोना योद्धाचाही होणार सन्मान;निवड समितीने पुरस्कार केले जाहीर..
तळेरे: प्रतिनिधी
कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने सन २०२० चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार गणपत उर्फ भाई चव्हाण, शशी तायशेट्ये स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वीरेंद्र चिंदरकर, अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार फोंडघाटचे पत्रकार कुमार नाडकर्णी यांना तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार कनेडी येथील पत्रकार संजोग सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे .
पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी खारेपाटण येथील उद्योजक रफिक नाईक यांची निवड करण्यात आली आहे. तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार कसवण गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हे पुरस्कार निवडण्यात आले आहेत. यावेळी सचिव नितीन सावंत, संजय सावंत, रंजीता तहसीलदार, मिलिंद डोंगरे, संतोष पाटणकर आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. कणकवली तालुका पत्रकार संघाच्या सर्वसाधारण सभेत पुरस्कार वितरण सोहळ्या विषयी चर्चा करण्यात आली, याच कार्यक्रमात कालावधीमध्ये तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले. त्यामध्ये कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार, कणकवलीचे महसूल मंडळ अधिकारी संतोष नागावकर, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडांग तसेच कोरोना कालावधीमध्ये गर्भवती असतानाही गृह भेटीतून घराघरात जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या वागदे गावातील आशा सेविका श्रद्धा गावडे यांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच कणकवली शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सदैव कार्यरत असणारे कणकवली न.प.चे सफाई कामगार यांचाही सत्कार करण्यात येणार आहे,अशी माहिती कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके,सचिव नितीन सावंत यांनी दिली आहे.