इचलकरंजी / प्रतिनिधी :
तारदाळ येथे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मदतीने बापानेच आपला मुलगा राहुल कोळी याचा सुपारी देऊन खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी राहुलचे वडील दिलीप तुकाराम कोळी (वय 55), पोलीस रेकॉर्डवरील विकास अनिल पोवार (वय 34, दोघे रा. तारदाळ) आणि सतीश शामराव कांबळे (वय 34, रा. तमदलगे) या तिघांना अटक केली. या तिघांना आज न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत शहापूर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, तारदाळ (ता. हातकणंगले) येथे राहणारा सचिन कोळी याचा फिरून चहा पावडर विकण्याचा व्यवसाय आहे. त्याचा भाऊ राहुल याचा 15 जुन रोजी तारदाळ माळावरील आयकॉनीक कंपनीच्या मागे रेल्वे रुळाजवळ मृतदेह मिळून आला होता. राहुल याच्या मृतदेहापासून काही अंतरावर पडलेल्या रक्तामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. पोलिसांनी नातेवाईकांकडं कसून चौकशी केली असता वडील दिलीप कोळी यांनी विकास पोवार आणि सतीश कांबळे यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. अधिक तपासात राहुल कोळी हा 10-12 वर्षांपासून मद्यपान करून घरी त्रास द्यायचा, वडीलांना घरातून निघून जा म्हणत धमकीही देत होता. तसंच लोकांकडून पैसे घेऊन कर्जाचा डोंगर केल्यानं या त्रासाला कंटाळून वडील दिलीप कोळी यांनी विकास पोवार आणि सतीश कांबळे यांच्याशी संगनमत करून राहुलच्या खूनाचा कट रचला. त्यासाठी विकास आणि सतीश यांना 50 हजार रुपयेही दिले होते. त्याप्रमाणे बुधवारी रात्री दिलीप यांनी मुलगा राहुल याला दुचाकीवरून आयकॉनीक कंपनीच्या मागे रेल्वे रुळाजवळ सोडून दिले. त्यानंतर विकास आणि सतीश या दोघांनी यंत्रमागाच्या मार्याने राहुलच्या डोक्यात वर्मी घाव घालून खून केल्याची कबुली दिली आहे. आज पोलिसांनी संशयीत तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांनी 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.