You are currently viewing टोल माफीसाठी भाजप व शिंदेगटाची नौटंकी कशाला- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख

टोल माफीसाठी भाजप व शिंदेगटाची नौटंकी कशाला- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख

 

आज भाजप आणि शिंदे गटाची केंद्रात व राज्यात सत्ता आहे. ओसरगाव टोल नाका हा इंग्लंडच्या राणीने सुरू केलेला नाही तर हा भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारनेच सुरू केला आहे. परंतू लोकाना मुर्ख बनवण्यासाठी आपणही टोल रद्द होण्यासाठी आंदोलन करत आहोत अशी नौटंकी भाजप आणि शिंदे गटाचे नेते करत आहेत म्हणूनच सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न पडला आहे की सर्व राजकीय पक्षांचा जर टोलला विरोध आहे तर या टोल सूरू करण्याच्या तारखा कोण देत आहे आणि टोल नाका सूरू कसा केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितिन गडकरी जे भाजपचे नेते आहेत त्यांच्या अखत्यारीत येते आणि ही प्रक्रिया त्यांच्या मार्फत राबवली जाते. मग भाजपच्या आणि शिंदे गटाच्या नेत्यांना टोल बंद व्हावा असे प्रामाणिकपणे वाटत असेल तर सरकारकडून प्रक्रियाच का थांबवली जात नाही? असा जनतेचा प्रश्न आहे. टोल सुरू करायचा आणि जनतेच्या विरोधामुळे टोल तात्पुरता ठेकेदाराने बंद करायचा आणि भाजपच्या नेत्यानी तो आपल्याचमुळे बंद झाल्याची फुशारकी मारायची हे नाटक कशाला? भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्याना खरोखरच हा टोल बंद व्हावा असे वाटत असेल तर कायम स्वरूपी टोल मुक्तीचा आपल्याच म्हणजे भाजप व शिंदे गटाच्या सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून लिखीत आदेश आणावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले आहे.
इर्शाद शेख पुढे म्हणाले की जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी पुर्वी पासून हा रस्ता अस्तित्वात होता आता फक्त या रस्त्याचे पुनर्वसन व रुंदीकरण करण्यात आले आहे. या रस्त्याशिवाय जिल्ह्यांतर्गत प्रवासाला दुसरा रस्ता नाही जनतेची दळणवळणाची व्यवस्था करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि हा जनतेचा मुलभूत अधिकार आहे अन्यथा जिल्ह्यांतर्गत प्रवासाची सरकारने पर्यायी व्यवस्था करावी. अजूनही भूसंपादनाचे प्रश्न प्रलंबित आहेत जमिनीचा मोबदला मिळालेला नाही, सर्विस रोडचे प्रश्न सुटलेले नाहीत, महामार्गावर शौचालय तसेच आवश्यक सुविधा निर्माण केलेल्या नाहीत. टोल नाक्यामुळे जिल्ह्याचे दोन भाग झालेले आहेत. टोल मुक्त सिंधुदुर्ग कृती समीती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहन धारकांना टोल मुक्ती मिळावी म्हणून सर्वाना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीने संघर्ष करीत आहे या पुढे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस टोल मुक्त सिंधुदुर्ग कृती समीतीच्या खांद्याला खांदा लावून सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोलमुक्ती मिळे पर्यंत संघर्ष करेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा