You are currently viewing मी वड बोलतोय्…

मी वड बोलतोय्…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*मी वड बोलतोय्….*

सात आठ वर्षांची असेन मी. कोणत्या यत्तेत होते आठवत नाही
आता.आमच्या भात नदीच्या काठावर आमचे खळे होते. त्या
खळ्यात नदी काठावर भला मोठा वटवृक्ष होता. केवढा पसारा
होता त्याचा! अबबबबबबबब! फांद्या अगदी जमिनीवर आलेल्या..! की ती फांदी धरून माकडासारखे थेट सरसर वर
झाडावर चढता यावे. खळ्याला कंपाऊंड होते. आमचे चार बैल
म्हणजे दोन जोड्या होत्या. खरिप व रब्बी दोन्ही हंगामात पात
(म्हणजे बैलांच्या पायाने धान्याची मळणी)चाले. खळ्यात बाजरीची कणसे भोत भरून आली की सालदार पात धरत
गरगर फिरत बैलांमागे फिरत असे व धान्य उपनून ढीग तयार
होत असे.

आणि मी वडिलांबरोबर खळ्यात येऊन खाटेवरून वर वडाबर
चढून बसत तासंतास गंमत बघत असे. हातात मी पुस्तक नेल्याचे काही आठवत नाही.मी घरी अभ्यास केलेला आठवतच नाही मला..! किती छान होते ना बालपण! ना कोणी
सांगितला ना मी केला.( केला असता तर हुशार झाले असते
ना? आता पछताये क्या…)त्या वडावर असंख्य पक्षी असत व
लाल रंगाची टेंभरे . जे पक्षी व मी खात असू.असा तो वड माझा मित्र होता व माझ्या मनात जाऊन बसला होता हे मला
माहितच नव्हते. मी बाहेर शिकायला गेले व जवळ जवळ त्याला विसरून गेले..

पण….?
माझे शिक्षण चालू असतांनाच माझे लग्न झाले नि मी प्रथम
सासरी गेले. ८/१५ दिवस राहिले नि मला माहेरचे लोक घ्यायला आले. गावच्या शिवेत एस टी शिरली नि नदी काठाने
ती एस टी येतांना तो वड मला दिसला.. काय आनंद झाला मला…!

रात्री झोपले नि काय? वड बाबा समोरच उभे राहिले.काय सुमती? मी एकदम दचकले!

विसरलीस मला? कशी ग अशी तू ? माझ्या अंगाखांद्यावर
खेळलीस, टेंभरे खाल्लीस, बागडलीस. मी किती खुश होतो ग!
चिमण्या कावळे घारी बगळे आणि तू! सारेच माझा आश्रय
घेत.किलबिल कलकल कचकच तुझी बडबड सारे तृप्त मनाने
मी डोळे बंद करून एखाद्या ध्यानस्थ मुनी सारखा ऐकत असे व
खुश होत असे. किती छान दिवस होते ग ! नदी काठीच मी
उभा असल्यामुळे मला अन्नपाण्याची तशी चिंता नव्हती.
संध्याकाळी गुरे वासरे घरच्या ओढीने पळत येत पण क्षणभर
माझ्या सावलीत विसावल्या शिवाय घरी जात नसत.मला त्यांचे विसावणे हंबरणे आवाज देणे रवंथ करणे खूप आवडायचे. जणू माझे घर आनंदाने भरल्याचा भास मला होई.
गुरांमागे गुराखी येत, ते ही माझ्या अंगाखांद्यावर विसावत
बांसरीचे सूर छेडत व पुन्हा माझी भावसमाधी लागे. तृप्त मनाने
मी व माझी पाने आसुसल्या सारखे ते स्वर मनात साठवत
डोलत असू.

हळू हळू गुरे वासरे घरचा रस्ता धरत व मी पुन्हा गुडूप अंधारात
बुडून अंग अकसून पाने मिटून झोपी जात असे. झोप कसली
ती? माझी लेकरे बाळे सारी पक्ष्यांची पिलावळ मानमुडपून
माझ्या खांद्यावर विसावलेली असे. त्यांचा तो श्वास म्हणजे
माझा श्वास होता. हो.. भरपूर प्राणवायु देणारा मी पृथ्वीवरील
जीवांचा रक्षक आहे माहित आहे ना तुला? म्हणून तर तुमच्या
पुर्वजांनी ठिकठिकाणी माझी नेमणूक केली ना? माझी पाने फुले फळे मुळे सारेच अत्यंत गुणकारी व औषधी आहेत ना!
आयुर्वेदिक औषधात माझा प्रचंड वापर होतो.म्हणूनच तर
मी ठाई ठाई तुम्हाला दर्शन देत होतो ना?

तुला आठवते का? त्या नंतर मी तुला कुठे भेटलो? अग मी
जरी इथे असलो तरी चराचरात जसा देव असतो तसाच मी
ही सर्वत्र दिसतो ना? माझीच अनेक रूपे ठायी ठायी दिसतात
म्हणजे मीच नाही का? अगं , कॅनडा कॅार्नर वरून तुम्ही त्र्यंबकला निघालात तेव्हा शरणपूर रस्त्यावर एकाला एक
खेटून किती वड होतो आम्ही? आणि तुझा धाकटा मुलगा
कसा पारंब्यांचा झोका खेळत होता? आणि तू उगाच काळजी
करत होती तो पडेल म्हणून ! वेडी ग वेडी! शेवटी आईच ना तू?
काळजी करणारंच! पण तुला एक सांगतो, विस्तारासाठी
जमिनिकडे येणाऱ्या आमच्या मुळ्याही तेवढ्याच मजबूत
असतात बरं!

आणि हो, आठवले, देवळाली रस्त्यावरून तू सिन्नरकडे
जात असतांना, देवळालीत शिरल्या शिरल्या खूप ठिकाणी
ठाई ठाई मी दिसू लागताच किती खुष झाली तू आठवते?
तू ड्रायव्हरला बोलली देखील,”किती सुंदर वडाची झाडे
आहेत हो इथे? आणि इतक्या संखेने? बाप रे! खूप नवल
वाटले होते ना तुला? अग, देवळाली म्हणजे सैनिकी कॅम्प!
तिथे मी निर्विघ्न वाढणारंच ना? बंदुकीच्या धाकाने तिथे येणार
कोण? आणि म्हणूनच आम्ही इतक्या संखेने रूजलो नि वाढलो बरं! नाही तर माणूस? तो कसला टिकू देतो आम्हाला? त्याला
काही ही दिसले की,ओरबाडायची सवय! त्याच्या समोर काही
वाचूच शकत नाही अशी आज परिस्थिती आहे.तुमचे पूर्वज
फार द्रष्टे होते म्हणून त्यांनी एवढ्या संखेने आमची लागवड
केली होती!

पण हाय रे हाय !..
आज आमचे सर्वांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. लोकसंखे
वाढी बरोबर माणसाने प्रचंड प्रमाणात वृक्षांची अमानुषपणे
कत्तल करून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला व
पर्यावरण हानी झाल्यामुळे त्याने अनेक आजारांना निमंत्रण दिले माहित आहे ना तुला?हवाच शुद्ध नाही ना? आमचे अस्तित्व आता अभावानेच दिसते ग , मोठ्या खेदाने मी हे बोलतो आहे. पण तू मात्र कमालीची आहेस बाई! अगं, रासे
गांवच्या फार्महाऊसवर काय नंदनवन फुलवलेस बाई तू?
कित्ती प्रकारची झाडे तू त्या मुरमाड जमिनीत लावली काय,
जोपासली काय? वाह वा.. अगं आता तिथे पक्षी व फुलपांखरे
देखिल येऊ लागलीत ना? खत काय पाणी काय कसलीही
कमतरता तू आम्हाला ? हो, गेट मध्येच स्वागताला मला उभे
केलेस ना तू? मी तर आता चांगलेच बाळसे धरले आहे बघ!
पुढच्या वर्षी तर तू बघतच राहशील एवढा वाढलेला असेन मी?

मला वाटले होते तू मला विसरली आहेस! पण नाही हो,
मी तुझ्या मनातून कधी गेलोच नाही म्हणून तर तू मला
रासेगांवला बोलावलेस व माझी जोपासना केलीस?
“Thank u सुमती, Thanks a lot” खरंच मी तुझा ऋणी
आहे. आताशा जरा माणसाला जाग येऊ लागली आहे कारण
पावसाचे सारे गणितच चुकले ना वृक्षतोडी मुळे! अवर्षण दुष्काळ अवकाळी ढगफुटी अशा कधी न पाहिलेल्या समस्या
उभ्या राहिल्या मुळे नजिकच्या काळात त्याचे डोळे उघडले तर
बरे, नाही तर काही खरे नाही! देव करो नि त्याला सुबुद्धी येवो व तो पर्यावरण रक्षण करो, एवढेच मी म्हणू शकतो. मला थोडीच हातपाय आहेत की मी माझा जाऊन रूजेल? माझी
लागवड तर करावीच लागते ना?

खूप बोललो बाई मी बघ. तुला झोपू ही दिले नाही. अगं पण,
मला हे कधीचेच तुझ्याशी बोलायचे होते, मन मोकळे करायचे
होते. किती हलके हलके वाटते आहे बघ आता! बस्स करतो
बाई आता, जातो, तू जरा निवांत थोडावेळ…झोप आता.
बाय बाय बेटा…

तुझाच जुना मित्र…
कापडण्याचा वड.

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ११ जून २०२३
वेळ: रात्री :९/३७

 

*संवाद मिडिया*

⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕

डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)

*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*
https://sanwadmedia.com/99114/

*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*

📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*

*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा