You are currently viewing कार्यकारी अभियंत्यांकडून नरमाईची भूमिका; सहाय्यक अभियंता मात्र गुन्हा दाखल करण्यावर ठाम

कार्यकारी अभियंत्यांकडून नरमाईची भूमिका; सहाय्यक अभियंता मात्र गुन्हा दाखल करण्यावर ठाम

कार्यकारी अभियंत्यांकडून गावातील वीज विषयक समस्या १५ दिवसांत दूर करण्याची लेखी हमी

कार्यकारी अभियंत्यांच्या आश्वासनानंतर वीज वितरणच्या कार्यालयाला ठोकलेले टाळे खोलले

मालवण

देवबाग गावातील वीज वितरणामधील त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी सरपंच उल्हास तांडेल यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पुकारलेल्या आंदोलनात अधिकारी जागेवर नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळे ठोकले. यानंतर याठिकाणी उपस्थित झालेल्या सहाय्यक अभियंता साखरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत ग्रामस्थ आणी महिलांनी त्यांना भर उन्हात थांबवत धारेवर धरले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुपारनंतर कणकवली येथून दाखल झालेल्या कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी सायंकाळी उशिरा ग्रामस्थांशी चर्चा करीत १५ दिवसात देवबाग मधील समस्या दूर करण्याची लेखी ग्वाही दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत कार्यालयाला ठोकलेले टाळे काढले आहे. त्यामुळे एकीकडे देवबाग ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आल्याचे दिसून येत असतानाच दुसरीकडे सहायक अभियंता साखरे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणास्तव ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढील कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे.

देवबाग मधील विजेच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर सरपंच उल्हास तांडेल यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी देवबाग ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयाला धडक दिली. मात्र याबाबतची आगाऊ माहिती देऊनही सहाय्यक अभियंता साखरे उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक होत कर्मचाऱ्यांना बाहेर काढत कार्यालयाला टाळे ठोकले. तर यानंतर येथे दाखल झालेल्या साखरे यांना धारेवर धरण्यात आले. यावेळी वीज कार्यालय परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेनंतर सायंकाळी कार्यकारी अभियंता मोहिते येथे दाखल झाले. सायंकाळी उशीरापर्यंत त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. या चर्चेनंतर १५ दिवसात देवबाग मधील विजेच्या समस्या दूर करण्याचे लेखी पत्र त्यांनी ग्रामस्थांना दिले आहे. त्यामुळे कार्यालयाला ठोकलेले टाळे काढण्यात आले आहे.

तक्रार देण्यासाठी साखरे पोलीस ठाण्यात !

एकीकडे कार्यकारी अभियंता मोहिते यांनी ग्रामस्थांशी चर्चा करीत आंदोलन मागे घेण्यात यशस्वी शिष्टाई केली असताना दुसरीकडे मात्र सहाय्यक अभियंता साखरे हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ठाण मांडून आहेत. तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्याशी बोलणी चालू होती. मात्र आपल्या भूमिकेवर ते ठाम होते. तक्रार आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पूढील कार्यवाहीकडे लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा